विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपची रणनीती; नेत्यांवर विभागनिहाय जबाबदारी
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक; आशीष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, संजय कुटे यांच्यासह प्रमुख नेते मैदानात

मुंबई : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच सरकार आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रमुख नेत्यांवर विभागनिहाय जबाबदारी सोपवण्याबाबत चर्चा झाली.
या रणनीतीनुसार मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री आशीष शेलार, मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार संजय कुटे यांच्यावर विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पक्षाची भूमिका विविध मुद्द्यांवर प्रभावीपणे मांडण्यासाठी महिला आणि युवा नेत्यांनाही या रणनीतीत महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ आणि आमदार देवयानी फरांदे यांच्याकडेही पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा – संजय राऊतांकडून मीनाक्षी शिंदेंची जुनी ऑडिओ क्लिप शेअर; पूर्णेकर हत्या प्रकरणाला राजकीय वळण
युवा नेत्यांमध्ये आमदार विक्रम पाचपुते आणि आमदार निरंजन डावखरे, तसेच भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर विविध राजकीय मुद्द्यांचा अभ्यास करून पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी राहणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या अधिकृत संघटनात्मक रचनेत नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ते म्हणून, तर निरंजन डावखरे आणि संजय कुटे यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांना तथ्यांच्या आधारे उत्तर देणे आणि सरकारच्या विविध योजना व निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा या रणनीतीचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित नेत्यांना त्यांच्या विषयानुसार जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत.
दरम्यान, भाजपच्या संघटनात्मक पातळीवर आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बैठका आणि तयारीला वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अलीकडे पक्षाच्या स्थानिक संघटनांबाबतही बैठका घेतल्या असून पक्षशिस्त आणि संघटनात्मक समन्वयावर भर दिला जात असल्याचे वृत्त आहे.





