स्टार्टअपची संख्या आणि अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर; भविष्यात जगाचे ‘Innovation Hub’ बनण्याचा फडणवीसांचा विश्वास
राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप; नवी मुंबईत ३०० एकरांवर ‘Innovation City’, दोन लाख युवकांना AI प्रशिक्षण देण्याची योजना

मुंबई : वित्त, उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून स्टार्टअपची संख्या आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्र देशाची ‘Startup Capital’ ठरत आहे. तरुणांचे संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र भविष्यात जगाचे ‘Innovation Hub’ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयाने आयोजित ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीतील विजेत्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. स्पर्धेची यंदाची संकल्पना ‘महाराष्ट्राला २०३५ पर्यंत संशोधनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी नवकल्पनांचा अविष्कार’ अशी होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भविष्यातील प्रशासकीय व्यवस्थेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल प्रशासन, शहरीकरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि नवोन्मेष परिसंस्था अशा विविध क्षेत्रांत नव्या पिढीचा दृष्टिकोन प्रशासनात आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कल्पनेपासून जागतिक कंपनीपर्यंत संपूर्ण साखळी उभी करणार’
नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, अमरावतीसह राज्याच्या कोणत्याही भागातील युवा संशोधकांना मार्गदर्शन, तंत्रज्ञान, इन्क्युबेशन आणि बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले. वर्गखोलीतील कल्पनेपासून जागतिक कंपनीपर्यंत तसेच कल्पनेपासून प्रत्यक्ष परिणाम आणि जागतिक विस्तारापर्यंतची संपूर्ण नवोन्मेष साखळी महाराष्ट्रात उभी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हॅकेथॉन किंवा नवोन्मेष स्पर्धेचा शेवट केवळ प्रमाणपत्र देण्यापुरता मर्यादित न राहता त्यातून समोर आलेल्या कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती
महाराष्ट्रात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप
देशातील एकूण स्टार्टअपपैकी सुमारे १८ टक्के स्टार्टअप महाराष्ट्रात असून राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नव्या कल्पनांचे संशोधन, परीक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्टार्टअप, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील पहिले समर्पित स्टार्टअप इन्क्युबेटर म्हणून ‘एम-हब’ विकसित करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नवी मुंबईत ३०० एकरांवर ‘Innovation City’
नवी मुंबईत सुमारे ३०० एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर केंद्रित ‘Innovation City’ उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ अंतर्गत दोन लाख युवक आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याची योजना असून, एआय आधारित संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यात एआय इन्क्युबेटर्स स्थापन करण्यात येणार आहेत.
शासकीय डेटाचा वापर युवा नवोन्मेषकांसाठी संशोधनाचा आधार म्हणून करता येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
४५ लाख विद्यार्थ्यांची क्षमता
महाराष्ट्रातील ८७ विद्यापीठे, सुमारे ५ हजार ५०० महाविद्यालये आणि ४५ लाखांहून अधिक विद्यार्थी उद्याचा महाराष्ट्र घडविण्याची क्षमता बाळगतात, असे फडणवीस यांनी सांगितले. नव्या कल्पना घेऊन पुढे येणाऱ्या युवकांना शासनाकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
२०१५ पासून मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमाच्या सात तुकड्यांमधील विविध क्षेत्रांतील युवा व्यावसायिकांना वरिष्ठ प्रशासनासोबत थेट काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवोन्मेष ही प्रमुख प्रेरक शक्ती ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती आणि तंत्रज्ञानाधारित संरचना महाराष्ट्रात उभारण्याचे राज्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





