भाजपाच्या मंत्र्याने तरुणाच्या कानशिलात लगावली; “भ्रष्टाचार उघड केल्याने मारहाण”, ‘आप’चा गंभीर आरोप

नवी दिल्ली | पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात रस्त्यांच्या पाहणी दौऱ्यावर गेलेले भारतीय जनता पक्षाचे नेते तथा दिल्ली सरकारमधील मंत्री परवेश वर्मा यांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पाहणीदरम्यान मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाच्या परवेश वर्मा यांनी थेट कानशिलात लगावल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परवेश वर्मा यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री परवेश वर्मा हे टिळक नगर परिसरातील एका रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. रस्त्याची पाहणी सुरू असताना गर्दीतील एक तरुण मोबाईलवरून या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. हे पाहताच संतापलेल्या परवेश वर्मा यांनी तरुणाचा मोबाईल हात धरून खाली ओढला आणि त्याच्या थेट कानशिलात लगावली. या प्रकारानंतर तो तरुणही आक्रमक होऊन परवेश वर्मा यांच्या दिशेने धावून गेला. दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची सुरू असताना सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र गर्दी वाढल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला.
हेही वाचा
२९ सप्टेंबरला मुंबईत ‘निर्धार मोर्चा’; आरक्षण उपवर्गीकरणासाठी निर्णायक लढा
मंत्री को गिरफ्तार करो।
मैं कल यहाँ जाऊँगा।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 27, 2026
‘परवेश वर्मांना तात्काळ अटक करा’ : अरविंद केजरीवाल आक्रमक
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर करत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या एका मंत्र्याने तरुणाच्या कानशिलात लगावली. मी स्वतः उद्या (२८ सप्टेंबर) टिळक नगर येथे जाऊन त्या रस्त्याची पाहणी करणार आहे. मात्र, अशा प्रकारे कायद्याची पायमल्ली करणाऱ्या परवेश वर्मा यांना तात्काळ अटक झाली पाहिजे,” अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटत असून, याप्रकरणी अद्याप मंत्री परवेश वर्मा किंवा दिल्ली सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.





