गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाचा अनुभव घेण्यासाठी परदेशी पर्यटक; पर्यटन विभाग उभारणार विशेष दालन
गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमोर मांडणार; ढोल-ताशांच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या भव्य गणेश विसर्जन सोहळ्याचा अनुभव परदेशी पर्यटकांना घेता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून विशेष दालन उभारण्यात येणार आहे. या दालनाच्या माध्यमातून पर्यटकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेसोबतच गणेशोत्सवाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजून घेता येणार आहे. विसर्जन सोहळ्याचे भव्य स्वरूपही त्यांना जवळून अनुभवता येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मंत्री देसाई म्हणाले की, समृद्ध सांस्कृतिक परंपरा हे महाराष्ट्राच्या पर्यटनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि उत्सवांचा आंतरराष्ट्रीय पर्यटकांना परिचय करून देण्यासाठी पर्यटन विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवासारख्या लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांस्कृतिक पर्यटनाला प्रोत्साहन देऊन राज्यातील पर्यटनवाढीला चालना देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
पूजा, आरती आणि ढोल-ताशांचा अनुभव
गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक गिरगाव चौपाटीवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांना गणपतीच्या मिरवणुकीचे दर्शन घेण्यासोबतच पूजा आणि आरतीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासह पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.
हेही वाचा – संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय कृती आराखडा तयार करा; गुलाबराव पाटलांचे निर्देश
मुंबईतील गणेशोत्सवाची व्यापक लोकसहभागाची परंपरा, गणेश मंडळांची आकर्षक सजावट, मिरवणुका आणि विसर्जन सोहळा यामुळे या उत्सवाला विशेष ओळख मिळाली आहे. हा सांस्कृतिक अनुभव नियोजनबद्ध पद्धतीने आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमोर मांडण्यासाठी विशेष दालनाची संकल्पना राबविण्यात आली आहे.
पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे यांनी सांगितले की, परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने गिरगाव चौपाटीवर विशेष दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या दालनातून गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी पर्यटकांना समजावून सांगण्यात येणार आहे.
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा महत्त्वाचा अनुभव आहे. विशेष दालनामुळे पर्यटकांना गणेशोत्सवाच्या विविध पैलूंची माहिती घेता येईल तसेच विसर्जन सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येईल.
या उपक्रमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, आदरातिथ्य आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या संधी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यास मदत होणार असून, राज्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.





