मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये ‘हिंदी दिन’ उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड | विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभाषेविषयी प्रेम, आदर आणि रुची वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ‘हिंदी दिन’ मोठ्या उत्साहात आणि गरिमामय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी कविता वाचन, भाषण, कथाकथन यांसह वैविध्यपूर्ण सांस्कृतिक सादरीकरणांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील हिंदी भाषेचे महत्त्व आणि तिची भूमिका विशद केली. तसेच हिंदी साहित्याचा समृद्ध वारसा आणि भाषेचे सौंदर्य यावरही या वेळी प्रकाश टाकण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा शुद्ध, समर्पक व प्रभावी वापर करण्यासाठी मार्गदर्शन करत प्रोत्साहित केले.
हेही वाचा
निवडणूक आयोगातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर; “कारभार अदृश्य हातांत”, काँग्रेसचा घणाघात
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला, सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला उत्तम व्यासपीठ मिळाले. संपूर्ण शालेय परिसर हिंदी भाषेच्या माधुर्याने आणि देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या उल्लेखनीय प्रयत्नांचे विद्यालय व्यवस्थापन व मुख्याध्यापकांनी विशेष कौतुक केले. “हिंदी ही आपली ओळख असून आपल्या संस्कृतीची सशक्त अभिव्यक्ती आहे,” असा मोलाचा संदेश देत आणि हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार व सन्मान करण्याचा संकल्प करत या कार्यक्रमाचा यशस्वी समारोप करण्यात आला.




