Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा तिरंगा फडकला! महिला क्रिकेट संघाचा श्रीलंकेविरुद्ध १४७ धावांनी दणदणीत विजय

Asian Games 2026 | भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत मानाच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १४७ धावांच्या प्रचंड फरकाने धुव्वा उडवत भारताला यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. यापूर्वी २०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक जिंकले होते; त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक राखण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांनी करून दाखवला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी ९९ धावांची शतकी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया रचला. शफाली वर्माने ४८ धावांचे योगदान दिले. तर उपकर्णधार स्मृती मानधनाने अवघ्या ४५ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि तब्बल ७ उत्तुंग षटकारांच्या मदतीने झंझावाती ७९ धावा कुटल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने १९ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये यष्टीरक्षक रिचा घोषने वादळी फलंदाजी करत २२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४९ धावा चोपून काढल्या. यामुळे भारताने निर्धारित षटकांत २१६ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली, जी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

हेही वाचा

राहुल गांधींच्या एका फोननंतर राहुल बोंद्रेंचा ‘यू-टर्न’? भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतल्याची चर्चा

दीप्ती-शफालीची भेदक गोलंदाजी

भारताने दिलेल्या २१७ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या ६९ धावांत गारद झाला. कर्णधार चमारी अट्टापटूच्या २९ धावा आणि कविशा दिल्हारीच्या ११ धावांचा अपवाद वगळता श्रीलंकेची एकही फलंदाज भारतीय माऱ्यासमोर दुहेरी धावसंख्या गाठू शकली नाही. भारताकडून फिरकीपटू दीप्ती शर्माने ३ बळी टिपले, तर शफाली वर्मा आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. श्रेयंका पाटीलने १ बळी मिळवून विजयावर शिक्कामोर्तब केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button