“राहुल गांधींनी आता मोदींनाच ‘पप्पू’ ठरवलंय”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर केलेल्या टीकेनंतर रंगलेल्या राजकीय वादात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. “राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवण्यासाठी भाजपने शेकडो कोटी रुपये खर्च केले; मात्र आज त्याच राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना ‘पप्पू’ ठरवले असून हीच भाजपच्या काळजातील खरी सल आहे,” अशा अत्यंत तिखट शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
संजय राऊत यांनी राहुल गांधींची पाठराखण करताना सांगितले की, राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणून त्यांना लोक मान सन्मान देतात. मोदींच्या वाढदिवसाला जे दिवे पेटवण्याचा कार्यक्रम झाला होता तो काय होता? सगळे मोदींना आशीर्वाद देत होते. हा सगळा कॉमेडियनच्या वरचा प्रकार आहेत. मोदी लोकसभेत आणि बाहेर ज्या पद्धतीने कॉमेडीचे प्रकार करत होते. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी यांची नक्कल करून दाखवली होती तो काय प्रकार होता? बोटं अशी अशी करून काय करून दाखवलं होतं? मोदींना लोकांनी जोकर ठरवलं आहे. देशात दोन जोकर आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये जोकरांची फौज आहे. त्याच्यावर जर फडणवीस बोलले तर बरं होईल. या देशाची परिस्थिती राहुल गांधींना माहीत आहे. देशातल्या अंधभक्तांना राहुल गांधींनी सोप्या पद्धतीने परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण समजावून सांगतात. राहुल गांधी अभिनय करू शकतात, राज ठाकरे, उद्धव ठाकरे करू शकतात. विरोधी पक्षातल्या नेत्यांना अभिनय करावा लागतो.
हेही वाचा
PCMC: कडक शिस्तीचे अधिकारी मनोज लोणकर यांचे ‘पंख छाटले’?
देवेंद्र फडणवीस यांना काय झालं आहे? त्यांना गोष्टी कळत नाहीत का? मला वाटतं की अमृता वहिनींनी त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे नेलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना काय झालं म्हणजे मेंदूला सूज वगैरे आली आहे का? ते समजू शकेल. असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांनाही टोला लगावला. मला एक सांगा पंडीत नेहरूंची खिल्ली कुणी उडवली? इंदिराजींवर सातत्याने टीका कोण करतं आहे? या सगळ्याची सुरूवात मोदींनी केली. राहुल गांधींच्या विरोधात जे कँपेन चालवलं ते तुमच्यावर आता उलटलं आहे. पंतप्रधानांवर टीका करायची नाही असं काही संविधानात लिहिलेलं नाही. तुम्ही राजकारणी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. तुमच्याकडून चूक झाली तर लोक तुमच्यावर टीका करतील. आम्ही विरोधी पक्ष म्हणून तेच काम करतो आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.





