आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलचे आंतरशालेय नाट्य व नृत्य स्पर्धेत सुवर्णयश; पटकावले उत्कृष्ट नाटकासह उपविजेतेपद!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी एल्प्रो मॉल येथे पार पडलेल्या भव्य आंतरशालेय नाट्य आणि नृत्य स्पर्धेत आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चमकदार कामगिरीने बाजी मारली आहे. शहराभरातील अनेक नामांकित शाळांच्या चुरशीच्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी उत्तम कलागुणांचे प्रदर्शन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत आर. के. एल. गॅलक्सीच्या नृत्य संघाने अत्यंत लयबद्ध, आकर्षक आणि कलात्मक नृत्याचे सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या या बहारदार सादरीकरणाला न्यायाधीशांनी दाद देत ‘प्रथम उपविजेतेपद’ (फर्स्ट रनर-अप) देऊन गौरवण्यात आले.
हेही वाचा – पारधी समाजातील एकही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; अशोक वुईके यांची ग्वाही
दुसरीकडे, शाळेच्या नाट्य संघाने एका आशयघन आणि प्रभावी नाटकाचे सादरीकरण करून संपूर्ण नाट्यगृह जिंकून घेतले. कलाकारांचा अभिनय आणि संवादातील ताकदीच्या जोरावर या नाटकाने या स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित ‘सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार’ (बेस्ट ड्रामा अवॉर्ड) आपल्या नावावर केला.
विद्यार्थ्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, प्राचार्य आणि शिक्षकवृंदाने अत्यंत अभिमान व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, त्यांची कलेप्रती असलेली निष्ठा आणि मार्गदर्शक शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांमुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगत शाळेतर्फे सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”आमच्या विद्यार्थ्यांचे हे यश अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. कला, नाटक आणि नृत्याच्या क्षेत्रात त्यांनी दाखवलेली सर्जनशीलता आणि मेहनत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पणाला जाते. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!”
– डॉ.पुष्कर चौबे ( CEO )
आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूल.




