TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘कामचुकारपणा किंवा तडजोड खपवून घेणार नाही’; तुकाराम मुंढेंचा FDA अधिकाऱ्यांना इशारा

‘चुकीचं काम करणं किंवा योग्य काम न करणं, दोन्हीमध्ये कारवाई होऊ शकते’; स्थानिक अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याचा इशारा

मुंबई : राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) कारवाया सुरू आहेत. भेसळयुक्त पनीर, दूध, मिठाई, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ तसेच गुटखा विक्रीविरोधात विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही स्पष्ट इशारा दिला आहे.

कामचुकारपणा करणाऱ्या किंवा कारवाईदरम्यान तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. न्यूज18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

‘कधीही कारवाई होऊ शकते’

FDAमधील अधिकारी किंवा कर्मचारी कामचुकारपणा करत असल्यास अथवा कारवाईदरम्यान तडजोड करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल का, असा प्रश्न मुंढे यांना विचारण्यात आला.

यावर ते म्हणाले, “काही दिवसांत म्हणण्यापेक्षा कधीही. जर कोणी कामचुकारपणा करत असेल किंवा कोणी काही तडजोड करताना दिसत असेल, तर त्यांच्याबाबत सहानुभूती दाखवण्याचं काही कारण नाही. चुकीचं काम करणं किंवा योग्य काम न करणं, या दोन्हीमध्येही कारवाई होऊ शकते.”

हेही वाचा –  पवई IITमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू; 400 हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

स्थानिक अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरणार

एखाद्या ठिकाणी मोठी कारवाई करण्यासाठी आयुक्त कार्यालयातून थेट समन्वय करण्यात आला होता. यावेळी पहाटे चार वाजता FDAची टीम संबंधित ठिकाणी पोहोचली आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली, असे मुंढे यांनी सांगितले.

मात्र, आपल्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर प्रकार सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांनाही आता जबाबदार धरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“त्यांच्या कार्यक्षेत्रात हे होत असताना तुम्ही त्याकडे का लक्ष दिलं नाही? त्यामुळे फूड बिझनेस ऑपरेटरबरोबरच ट्रान्सपोर्टर्स किंवा डिलर्स हे देखील यासाठी तेवढेच जबाबदार आहेत. तसेच आमच्या विभागात कुठे चुका होत असतील, तर त्याबाबतही कारवाई केली जाईल,” असे मुंढे यांनी सांगितले.

FDAच्या कारवायांमुळे चर्चा

तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील अन्न भेसळ आणि नियमबाह्य खाद्य व्यवसायांविरोधातील कारवायांकडे लक्ष वेधले जात आहे. पनीर, दूध, मिठाई यांसह हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांची तपासणी तसेच गुटखा विक्रीविरोधातील कारवायांमुळे FDAच्या कामकाजाची चर्चा वाढली आहे.

दरम्यान, कारवाई करणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश मुंढे यांच्या वक्तव्यातून देण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button