तुकाराम मुंढेंचे अरबाज शेखकडून आभार; म्हणाला, ‘महाराष्ट्राला तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज’
वडिलांच्या उपचारावेळी केलेल्या कारवाईची आठवण; रुग्णालये, ॲम्बुलन्स आणि मेडिकल रेफरलमधील कथित कमिशनची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या कारवायांमुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर नागरिकांकडून तक्रारी आणि गैरप्रकारांची माहिती त्यांना टॅग करून दिली जात आहे. या तक्रारींवर प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता ‘सैराट’ चित्रपटातील ‘लंगड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याने तुकाराम मुंढे यांचे आभार मानणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वी अरबाजच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयाकडून जास्त पैसे आकारले जात असल्याचा दावा करत अरबाजने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली होती.
आता अरबाजने पुन्हा एक व्हिडीओ पोस्ट करत तुकाराम मुंढे यांचे आभार मानले आहेत. आपल्या कुटुंबावर आलेल्या प्रसंगी मुंढे यांनी मदत केली आणि कारवाई केली, असा दावा अरबाजने केला.
हेही वाचा – शरद पवारांच्या पत्रावर फडणवीसांची भूमिका; ‘NDRFची वाट न पाहता राज्याच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत’
‘मेडिकल सेक्टरमधील कथित लुटीची चौकशी गरजेची’
अरबाजने आपल्या व्हिडीओमध्ये मेडिकल क्षेत्रातील काही कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली. डॉक्टरांनी रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरांकडे रेफर केल्यानंतर कथित कमिशन, ॲम्बुलन्सचे शुल्क आणि सीटी स्कॅनसाठीच्या रेफरलमधील कथित कमिशन यांसारख्या बाबींची पारदर्शक चौकशी होण्याची गरज असल्याचे त्याने म्हटले.
मात्र, हे आरोप सर्व डॉक्टर किंवा रुग्णालयांबाबत नसल्याचेही अरबाजने स्पष्ट केले. अनेक डॉक्टर आणि रुग्णालये प्रामाणिकपणे, माणुसकीने आणि सेवाभावाने काम करत असल्याचे त्याने नमूद केले.
‘महाराष्ट्राला तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज’
आपल्या कुटुंबावर कठीण प्रसंग आला असताना तुकाराम मुंढे यांनी मदत केली आणि कारवाई केली, त्यामुळे आपण त्यांचा वैयक्तिकरित्या आभारी असल्याचे अरबाजने सांगितले. महाराष्ट्राला प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचेही त्याने म्हटले.
अरबाजने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘रुग्ण हा ग्राहक नाही, तो एक माणूस आहे’ असा संदेश दिला. ही लढाई प्रामाणिक डॉक्टरांविरोधात नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.




