मोहसीन नक्वींना भारतीय संघाने का नाकारली ट्रॉफी? बीसीसीआयने सांगितले कारण

BCCI | महिला आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला ७२ धावांनी धूळ चारून भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. मात्र, या दिमाखदार विजयानंतर भारतीय महिला संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील पुरुष संघानेही नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. आता लागोपाठ दुसऱ्यांदा भारताने हाच पवित्रा घेतल्याने क्रिकेट जगतात चर्चा रंगली असून, यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यामागची भूमिका मांडली. सैकिया म्हणाले, “यामागे वेगळे कोणतेही कारण नसून थेट राष्ट्रीय सुरक्षेशी आणि भावनेशी जोडलेला हा मुद्दा आहे. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी घटनेनंतर पाकिस्तानसोबतचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आम्हाला त्यांच्याविरुद्ध कोणताही सामना खेळायचा नव्हता, परंतु केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाचा आदर ठेवून आम्ही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.”
हेही वाचा
पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या विकेंद्रीकरणासाठी जागा केल्या प्रस्तावित
एसीसीच्या परंपरेचा हवाला देत सैकिया पुढे म्हणाले, “आशिया चषकाबाबत एक जुना अलिखित नियम राहिला आहे; जो संघ जेतेपद जिंकतो, त्या संबंधित देशाचा क्रिकेट बोर्ड सचिव किंवा अध्यक्ष ट्रॉफी प्रदान करतो. भूतकाळात बांगलादेश किंवा श्रीलंका जिंकली असताना तत्कालीन एसीसी अध्यक्ष जय शाह ट्रॉफी देण्यासाठी पुढे गेले नव्हते. मात्र, भारतीय संघ जिंकल्यानंतर या संकेतांचे पालन झाले नाही आणि मोहसीन नक्वी स्वतः ट्रॉफी देण्यासाठी पुढे आले. परंतु विद्यमान परिस्थिती पाहता आम्ही त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणे शक्य नव्हते.”
भारताविरुद्ध युद्धाची भाषा करणाऱ्याकडून ट्रॉफी कशी घेणार?
भारताच्या भूमिकेचे समर्थन करताना सैकिया यांनी स्पष्ट केले की, “प्रत्येक भारतीय खेळाडू आणि देशवासीयांसाठी नेहमीच देश प्रथम स्थानी आहे. जो व्यक्ती उघडपणे आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषा करतो, त्याच्या हातून आमच्या खेळाडूंनी ट्रॉफी कशी स्वीकारावी? हीच संपूर्ण देशाची आणि १२५ कोटी जनतेची भावना आहे. याच कारणास्तव आधी पुरुष संघाने आणि आता महिला संघानेही मोहसीन नक्वींकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारण्यास नकार दिला.”




