सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरतीचा मार्ग मोकळा होणार?; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सकारात्मक भूमिका
बँकेची आर्थिक व प्रशासकीय कामगिरी उत्कृष्ट; रिक्त पदे, मनुष्यबळ आणि भरतीच्या आवश्यकतेचा आढावा

मुंबई : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पदभरतीच्या अनुषंगाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बँकेची आर्थिक व प्रशासकीय स्थिती, उपलब्ध मनुष्यबळ आणि रिक्त पदांसह नोकरभरतीची आवश्यकता याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे, सहसचिव संतोष पाटील, अतिरिक्त निबंधक नामदेव यगलेवाड यांच्यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पदभरतीच्या विविध बाबींचा आढावा
बैठकीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसंदर्भातील विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. बँकेची आर्थिक व प्रशासकीय स्थिती, सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ, रिक्त पदांची संख्या, नोकरभरतीची आवश्यकता तसेच भरतीसंदर्भातील नियम आणि निकष याबाबत संबंधितांकडून माहिती घेण्यात आली.
हेही वाचा – आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही; मंत्री अशोक वुईके यांचे निर्देश
‘नोकरभरतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल’
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट असून बँकेची आर्थिक आणि प्रशासकीय कामगिरीही चांगली आहे. त्यामुळे नोकरभरतीच्या विषयावर निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.
या संदर्भातील संपूर्ण माहिती घेऊन सर्व बाबींचा विचार करण्यात येईल आणि त्यानंतर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील इच्छुक उमेदवारांच्या पदभरतीच्या अपेक्षांना आता बळ मिळाले आहे.




