बाबुरावजी घोलप साहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनी वाघोलीत भव्य पूजन सोहळा!

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्याण मंगल कार्यालय, वाघोली येथे संस्थेचे संस्थापक स्व. बाबुराव रामचंद्र घोलप साहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे पूजन सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात पार पडले.
संस्थेच्या ‘सेवक कल्याण निधी संस्थे’चे अध्यक्ष व सर्व सदस्यांच्या पुढाकाराने घोलप साहेबांच्या पुतळ्याचे आकर्षक रंगकार्य, नयनरम्य मेघडंबरी आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईचे (लाइटिंग) काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या सौंदर्यीकरणानंतर आयोजित करण्यात आलेल्या या पूजन सोहळ्याला मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन
सोमवारी सकाळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे मानद सचिव संदीपजी कदम साहेब, उपसचिव मा. श्री. एल. एम. पवार साहेब आणि सह-सचिव मा. श्री. जाधव साहेब या मान्यवरांच्या शुभहस्ते बाबुरावजी घोलप साहेबांच्या मेघडंबरीत विराजित पुतळ्याचे रीतसर पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
हेही वाचा
राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यावर भर
शैक्षणिक संकुलाची उत्स्फूर्त उपस्थिती
या सोहळ्याला सेवक सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच वाघोली येथील ‘वि. शे. सातव हायस्कूल’, ‘कनिष्ठ महाविद्यालय’, ‘व्यवसाय अभ्यासक्रम विभाग’, ‘प्राथमिक विद्यालय’ आणि ‘विठ्ठलराव सातव इंग्लिश मिडीयम स्कूल’ या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या कार्याचा गौरव व आभार
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाबुरावजी घोलप साहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा उजाळा दिला. तसेच संस्थेच्या यशस्वी वाटचालीवर व भावी ध्येयांवर प्रकाश टाकला.
संस्थेच्या संस्थापकांच्या पुतळ्याचे अत्यंत सुबक व सुंदर काम पूर्ण केल्याबद्दल ‘सेवक कल्याण निधी संस्थे’च्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक हार्दिक आभार मानण्यात आले.





