सण-उत्सव पारंपरिक पद्धतीनेच साजरे व्हावेत; डीजे संस्कृतीवर राज ठाकरे भडकले

Raj Thackeray | “इतक्या श्रद्धेने बाप्पाला घरी आणायचा आणि विसर्जनाच्या वेळी नाचायचं? गणपती बाप्पा जाताना घर ओकंबोकं वाटतं, वाईट वाटायला हवं; मग हा कसला आनंद साजरा करताय? कसले डॉल्बी आणि कसले डीजे?”, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सण-उत्सवांच्या नावाखाली सुरू असलेल्या विकृतीवर आणि कर्णकर्कश डीजे संस्कृतीवर जोरदार प्रहार केला. मुंबईत आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डीजेबंदीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, “सध्या डीजेबंदीवरून मोठा वाद सुरू आहे, पण मी यावर आधीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. आपल्या पारंपरिक वाद्यांसह आणि पद्धतीने सण का साजरे होत नाहीत? बाप्पा जाताना मनाला चटका लावणारा विरह असतो, पण आपण तिथे नाचतोय हे अनाकलनीय आहे.”
हेही वाचा
‘एमपीएससी’वर भाजपचा ताबा; राहुल गांधींचा महायुती सरकारवर घणाघात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
उत्तरेकडील संस्कृतीचे अनुकरण कशासाठी
सध्याच्या सणांमधील बदलत्या स्वरूपावर तीव्र आक्षेप घेत राज ठाकरे म्हणाले की, गोविंदाच्या वेळी महिलांना व्यासपीठावर आणून नाचवायचं, हे प्रकार उत्तरेत चालतात. ते आपण महाराष्ट्रात का आणतोय? आपण त्यांना शिकवायचं की त्यांचं अनुकरण करायचं? काय आहे आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास? मध्यंतरी महाराष्ट्राने जगाला दिशा दाखवली, उत्तुंग व्यक्तिमत्त्वे दिली; मग हा महाराष्ट्र आता त्यांचे अनुकरण करणार का? सण हे महाराष्ट्राच्या मूळ संस्कृतीनुसारच साजरे झाले पाहिजेत.
डीजेच्या आवाजाने लोकांचे कान-डोळे गेले; धर्मांधतेचा धोका
ध्वनिप्रदूषणाचे गंभीर परिणाम मांडताना राज ठाकरे म्हणाले की, “या डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटामुळे अनेकांचे डोळे आणि कान निकामी झाले आहेत. ज्याला हृदयाचा थोडाही त्रास असेल, असा माणूस या आवाजाने जागीच जीव गमावू शकतो. लोकमान्य टिळकांनी कशासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता आणि आपण तो कुठे आणून ठेवलाय? उत्सव साजरा करणे इथपर्यंत ठीक आहे, पण धर्मांधपणा देशाला थेट खड्ड्यात घेऊन जातो. जे देश धर्माच्या नावावर उभे राहिले ते आज पुढे चालले आहेत आणि आपण मात्र धर्मांधतेत अडकून मागे चाललो आहोत.”





