शिक्षक दिन विशेष लेख: वस्त्यांमधील वंचित मुलांना घडवतेय ही शिक्षिका…
गौरी सोनवणे यांचे ज्ञानदानाचे आदर्श कार्य

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – संध्या नांगरे
पुण्यातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गरीब, वंचित कुटुंबांतील मुलामुलींसाठी छोटीशी शाळा भरवून ही शिक्षिका या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटतेय. एवढेच नव्हे तर त्यांच्या पालकांना देखील साक्षर करण्याचा वसा तिनं घेतलाय. गरीब कुटुंबांमधील लेकरांना ज्ञानदान करण्याचा वसा घेतलेली ही शिक्षिका म्हणजे गौरी सोनवणे-बोरकर (वय ४०)
गौरीताई या पुण्यात स्थायिक आहे, त्यांच्या समाजकार्याची सुरुवात पिंपरीतून झाली आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी एम. एस. डब्ल्यू ही पदवी पूर्ण केली. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केले.
समाजात काम करताना झोपडपट्ट्यांमध्ये-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांची आरोग्य आणि शिक्षणाची हेळसांड त्यांनी अनुभवली आणि या मुलांच्यात बदल घडवण्याचा निर्धार गौरीताईने केला. गौरीताई आणि तिचे पती विकास दोघे वंचित मुलांना व त्यांच्या पालकांनाही
पुस्तकी शिक्षणाबरोबर इतर अनेक गोष्टींचे धडे देत आहेत.
साधारण दहा वर्षांपूर्वी गौरीताईने स्वतःची अभिनव विकास फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली आणि कोथरूड परिसरातील वसाहतीत त्यांनी काम सुरू केले.
विविध वस्त्यांचा अभ्यास केला, तिथल्या लहान मुलांच्या गरजा जाणून घेतल्या. पालकांशी बोलून कर्वेनगरातील वस्तीतच एका लहानशा पत्र्याच्या खोलीत विनाशुल्क शाळा सुरू केली. ही शाळा रोज सायंकाळी भरायची. गौरीताई या मुलांचा अभ्यास घ्यायची.
मराठी व इंग्रजी अक्षरांची ओळख, पाढे, छोटी गणिते असा अभ्यास घ्यायची. त्यांना चांगल्या सवयी लावायची. अभ्यासाबरोबरच ताईने मुलांना प्रार्थना-श्लोक शिकवले, गोष्टी सांगितल्या. आपल्या वस्तीतच असलेल्या या विनाशुल्क शाळेमध्ये पालकही मुलांसोबत आवडीने यायचे.
हेही वाचा – सात राज्यांतील न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

अशा अभ्यासातून मुलांच्या शिक्षणाचा पाया पक्का होऊ लागला. त्यांना शिस्तीचे धडे मिळाले. त्यामुळे मुलांना आणि पालकांना शाळेची या शाळेची ओढ लागली. शाळेला प्रतिसाद वाढू लागला.
गौरीताईची ही शाळा आता वस्तीतील मुलांची आपली हक्काची शाळा बनली आहे. गौरीताईचे पती विकास बोरकर यांनी देखील स्वतःला या कामात झोकून दिले आहे.
गौरीताई आणि विकास सर हे मुलांचे व पालकांचे लाडके बनले आहेत. गौरीताईंच्या कार्याचा आता विस्तार झालाय. गेल्या तीन-चार वर्षांत अभिनव विकास फाउंडेशन आणखी वस्त्यांमध्ये पोहोचली आहे.
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात वस्त्यांमध्ये अभिनव विकास फाउंडेशनचे काम सुरू आहे.
पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकी शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी विविध कला-कौशल्ये शिकवली जातात.
मैदानी खेळ, पारंपरिक खेळ व नृत्य प्रशिक्षण, विविध स्पर्धा, मनोरंजनपर कृतीपत्र, विविध सण- समारंभ-दिनविशेष साजरे करणे, स्नेहभोजन, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी, मान्यवरांचे मार्गदर्शन व त्यांच्याशी संवाद असे निरनिराळे उपक्रम गौरिताईने मुलांसाठी आणले आहेत. मुले व पालकही या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे गौरीताईकडे शिकणाऱ्या मुलांच्या मातांनी देखील दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा उत्तीर्ण केली आहे.
या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं उपलब्ध करणं, त्यांच्या नोट्स काढणं, उजळणी घेणं, त्यांचे परीक्षेचे अर्ज भरणं… अशा सर्व गोष्टी गौरीताई आणि त्यांचे पती उस्फूर्तपणे पार पाडत आहेत.
समाजभान असलेले अनेक तरुण, विविध क्षेत्रातील जाणकार अभिनव विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून वंचित मुलांच्या विकासासाठी आपला वाटा देत आहेत. हे काम अनेक वस्त्यांमध्ये पोहोचवण्याचा गौरीताईचा निश्चय आहे.
विद्यार्थी आणि शिक्षिका यांचं सुंदर नातं गौरीताईच्या शाळेत अनुभवायला मिळतं. विद्यादानाचं हे अनमोल कार्य करणारी या आगळीवेगळी शिक्षिका प्रेरणादायी, वंदनीय आहे.
गौरीताई म्हणते…
*“शिक्षणाच्या माध्यमातून वंचित घटकातील मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा सर्वांगीण विकास करणं हे माझं ध्येय आहे
अभिनव विकास फाऊंडेशनशी शंभराहून अधिक मुले जोडली गेली आहेत. त्यांचा आम्हाला लळा लागलाय. त्यांच्यातील व त्यांच्या पालकांमधील बदल पाहताना आपण करत असलेल्या कामाचं समाधान वाटतं. या माध्यमातून अनेक लोक वंचित मुलांसाठी काम करण्यास पुढे येत आहेत. पाठ्यपुस्तकांबरोबरच विविध प्रकारची कला कौशल्ये ही वंचित मुले शिकू लागली आहेत, चांगल्या सवयी त्यांनी अंगीकारल्या आहेत. त्यांच्या पालकांमध्येही उत्तम बदल झाला आहे ही आनंदाची गोष्ट आहे.” – गौरी सोनवणे.





