ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करा; नाना काटेंची आयुक्तांकडे मागणी

मिरवणूक व विसर्जन मार्गांसह प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी; नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

पिंपरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रस्ते तातडीने खड्डेमुक्त करून आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गणेशोत्सव काळात शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि विसर्जन मार्गांवर भाविक, नागरिक तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढत असते. मात्र शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होण्याची शक्यता असून दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका वाढला असल्याचे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

गणेशोत्सव हा आनंद आणि भक्तीचा उत्सव असून या काळात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे कोणत्याही नागरिकाला अपघाताला सामोरे जावे लागू नये, ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पिंक टॉयलेट’ला ग्रीन सिग्नल

तसेच गणेश मंडळांच्या मिरवणूक मार्गांवरील रस्ते, विसर्जन मार्ग, प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणांची विशेष तपासणी करून आवश्यक ठिकाणी डांबरीकरण व रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात घडू नयेत यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

“गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि आनंददायी होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे हा विषय केवळ नियमित काम म्हणून न पाहता नागरिकांच्या जीविताशी संबंधित महत्त्वाचा विषय म्हणून गांभीर्याने घेऊन गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करावे,” असे आवाहनही त्यांनी महापालिका प्रशासनाला केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button