पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पिंक टॉयलेट’ला ग्रीन सिग्नल
महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधांना प्राधान्य; राणीमाई पठारे यांची सभागृहात आग्रही भूमिका

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘पिंक टॉयलेट’च्या संकल्पनेला सभागृहात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सर्वसमावेशक सार्वजनिक स्वच्छता धोरणाला मान्यता देताना महिलांच्या गरजा लक्षात घेऊन पिंक टॉयलेटची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई अशोक पठारे यांनी केली.
महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सभागृहाचे लक्ष वेधताना राणीमाई पठारे म्हणाल्या की, “महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ पिंक टॉयलेट्स ही आजच्या काळाची गरज आहे. महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसमावेशक सार्वजनिक स्वच्छता धोरणाला दि. २९ जुलै २०२६ रोजी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे हे धोरण केवळ कागदावर न राहता त्याची ठोस आणि प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – ‘हिंसाचार योग्य नाही’; डीजेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
शहरातील प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतागृहाची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेचा दर्जा कायम ठेवावा तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. पिंक टॉयलेटच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना अनेक नगरसेवकांनीही या उपक्रमाला समर्थन देत त्याचे स्वागत केले.
महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित स्वच्छतागृहांची उपलब्धता ही केवळ सुविधा नसून महिलांच्या सुरक्षिततेशी, आरोग्याशी आणि सन्मानाशी संबंधित बाब आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी सभागृह आणि प्रशासनाचे आभार मानताना राणीमाई पठारे यांनी पिंपरी-चिंचवडला महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त शहर बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पिंक टॉयलेट ही केवळ महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची संकल्पना नाही, तर त्यांच्या सुरक्षिततेचा, स्वच्छतेचा आणि सन्मानाचा विषय आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक महिलेला सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृहाची सुविधा मिळाली पाहिजे. सर्वसमावेशक सार्वजनिक स्वच्छता धोरणाला मान्यता मिळाल्याने आता प्रशासनाने त्याची प्रभावी अंमलबजावणी करून शहरातील पिंक टॉयलेट्सची नियमित देखभाल, तपासणी आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करावे. महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
— राणीमाई अशोक पठारे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.





