Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला नवी दिशा; गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाला मोठी चालना

२०१२ पासूनच्या सहकार्याचा विस्तार; वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रात सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स यांच्यात २०१२ पासून असलेली भागीदारी आता अधिक व्यापक, महत्त्वाकांक्षी आणि परिणामाभिमुख करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सहकार्याला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यू साउथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांच्या उपस्थितीत विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

२०४७ च्या विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाला बळ

वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, संस्कृती आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यात येणार आहे. ही क्षेत्रे २०४७ पर्यंत महाराष्ट्राला विकसित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राज्य बनविण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राला भारतातील गुंतवणुकीचे प्रवेशद्वार बनविण्याचे आवाहन

मुंबई आणि सिडनी ही अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलियाची महत्त्वाची वित्तीय व व्यावसायिक प्रवेशद्वारे आहेत. त्यामुळे न्यू साउथ वेल्समधील वित्तीय संस्था, व्यावसायिक सेवा कंपन्या, पायाभूत सुविधा गुंतवणूकदार आणि सुपरॲन्युएशन फंडांनी महाराष्ट्राकडे भारतातील गुंतवणुकीचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

महाराष्ट्रातील वाहतूक पायाभूत सुविधा, औद्योगिक कॉरिडॉर, नागरी विकास, अक्षय ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती; नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचे सचिन अहिरांचे निर्देश

ईव्ही, बॅटरी आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये संयुक्त प्रकल्प

तंत्रज्ञान, उत्पादन आणि ऊर्जा संक्रमणाच्या क्षेत्रातही मोठ्या सहकार्याची क्षमता आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सक्षम परिसंस्था उभारत आहे.

न्यू साउथ वेल्सकडील खाण तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे, स्वच्छ ऊर्जा आणि नवोन्मेषातील अनुभवाचा उपयोग करून बॅटरी उत्पादन, हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात संयुक्त प्रकल्प विकसित करता येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कौशल्य विकास आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य

कौशल्य विकासाच्या क्षेत्रात न्यू साउथ वेल्सच्या Technical and Further Education संस्थांबरोबर महाराष्ट्रातील औद्योगिक व कौशल्य विकास संस्थांमध्ये संयुक्त अभ्यासक्रम, प्रशिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि उद्योगाशी संलग्न प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

न्यू साउथ वेल्समधील विद्यापीठांनी नवी मुंबईजवळील आंतरराष्ट्रीय शिक्षण नगरीत सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

मराठवाडा, विदर्भासाठी कृषी सहकार्य

न्यू साउथ वेल्सचा दुष्काळ व्यवस्थापन, शेती आणि जलसंधारणाचा अनुभव महाराष्ट्रासाठी विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी दोन्ही राज्यांतील कृषी विद्यापीठांमधील भागीदारी वाढविण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

९० दिवसांत संयुक्त कार्यगट

सामंजस्य कराराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ९० दिवसांत संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे. हा कार्यगट प्रमुख प्रकल्प निश्चित करेल, दोन्ही राज्यांतील संबंधित संस्थांच्या जबाबदाऱ्या ठरवेल आणि प्रकल्पांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेईल.

आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर

महाराष्ट्र आणि न्यू साउथ वेल्समधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी खाणकाम, तंत्रज्ञान, पर्यटन, शिक्षण, प्रगत उत्पादन, सर्क्युलर इकॉनॉमी, आरोग्यसेवा आणि खाण तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र आणि न्यू साउथ वेल्समधील आर्थिक संबंधांना नवी दिशा मिळाली असल्याचे न्यू साउथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांनी सांगितले.

भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदाय महत्त्वाचा दुवा

महाराष्ट्रातील अनेक तरुण गेल्या अनेक दशकांपासून शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जात आहेत. न्यू साउथ वेल्समधील भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायाचे महाराष्ट्राशी कौटुंबिक, सांस्कृतिक आणि भाषिक संबंध आहेत. हा समुदाय दोन्ही राज्यांमधील संबंधांचा महत्त्वाचा दुवा असल्याचे क्रिस मिन्स यांनी नमूद केले.

भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकांनी ऑस्ट्रेलियाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या भारतीय वारशाचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांना सिडनी भेटीचे निमंत्रण

महाराष्ट्र आणि न्यू साउथ वेल्सच्या अर्थव्यवस्थांमध्ये परस्परपूरक क्षमता असून, त्याचा उपयोग द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी करता येईल, असे मिन्स यांनी सांगितले. संयुक्त कार्यगट स्थापन करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले.

महाराष्ट्र आणि न्यू साउथ वेल्समधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आणि दूरदृष्टीचे कौतुक करत क्रिस मिन्स यांनी त्यांना सिडनी भेटीचे निमंत्रण दिले.

यावेळी राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह न्यू साउथ वेल्सचे ट्रेझरर डॅनियल मुखी, ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन, सचिव मायकल कॉट्स-ट्रॉटर, व्यापार आणि गुंतवणूक आयुक्त मालिनी दत्त आणि संचालक सचिन सक्सेना उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button