Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती; नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचे सचिन अहिरांचे निर्देश

बीडीडी चाळीसह मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर विधान भवनात बैठक; पर्यायी निवास, पुनर्वसन आणि मालकी हक्काच्या मुद्द्यांवर चर्चा

मुंबई : म्हाडा प्राधिकरणाशी संबंधित विविध गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्वसन आणि पुनर्विकासाच्या प्रश्नांवर विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठक झाली. या बैठकीत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासह मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्थांच्या प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढावा, असे निर्देश सचिन अहिर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बीडीडी चाळ पुनर्विकासातील प्रश्नांवर चर्चा

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत लॉटरीद्वारे होणाऱ्या घरवाटपातील अडचणी, वरळी बीडीडी चाळीतील संबंधित कुटुंबांना पर्यायी निवास तसेच संक्रमण शिबिरातील नागरिकांच्या विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली.

लोअर परळ येथील सरस्वती बिल्डिंगमधील दहा रहिवाशांना पर्यायी सदनिका देण्याच्या प्रश्नावरही विचारविनिमय करण्यात आला. तसेच ना. म. जोशी मार्गावरील ३६५ आणि शिवशक्ती पार्क येथील तानवडे यांच्यासह अन्य ३० रहिवाशांनी सादर केलेल्या निवेदनांवर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा –  सरकारी योजनांच्या परिणामांचा आता ‘डेटा’च्या आधारे आढावा; महाराष्ट्रात ‘महा-टॅक’ची स्थापना

मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न

भायखळा येथील गीतांजली बिल्डिंगचा पाच म्हाडा इमारतींच्या क्लस्टरमध्ये समावेश करण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. एसव्हीपी नगर सोसायटीतील HIG आणि LIG पुनर्वसन, टागोर नगरमधील घरकुल सोसायटीतील कुटुंबांना कायमस्वरूपी मालकी हक्क देणे आणि अभ्युदयनगरमधील इमारतींच्या पुनर्विकासाबाबतही चर्चा झाली.

याशिवाय रुस्तम ताडीवाला चाळ आणि शाहसदन सोसायटीशी संबंधित नागरिकांच्या निवेदनांवरही बैठकीत विचार करण्यात आला.

नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश

विविध गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांचा संबंधित यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन कायदेशीर आणि प्रशासकीय चौकटीत योग्य मार्ग काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश सचिन अहिर यांनी दिले.

बैठकीस म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह म्हाडाचे संबंधित अधिकारी आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button