Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया भागीदारीला नवी गती; ‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’चा प्रस्ताव

गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन सहकार्याला चालना; संयुक्त प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि सामायिक समृद्धीवर भर

मुंबई : जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्परपूरक भागीदारीची मोठी संधी आहे. या भागीदारीला नवी गती देण्यासाठी प्रत्यक्ष प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि सामायिक समृद्धी साध्य करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.

ऑस्ट्रेलियन जैवउत्पादन कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील जैवउत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन सहकार्याच्या विविध संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र कटिबद्ध

मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक आणि आर्थिक शक्तिकेंद्र आहे. जैवतंत्रज्ञान, नवकल्पना तसेच कृषी, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातील जैवआधारित उपायांच्या माध्यमातून राज्याचा विकास अधिक शाश्वत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

ऑस्ट्रेलियाकडे जागतिक दर्जाचे विज्ञान, तंत्रज्ञान, भांडवल आणि संशोधन क्षमता आहे. दुसरीकडे महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, सक्षम पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता आहे. या दोन्ही देशांच्या सामर्थ्यांचा योग्य समन्वय साधल्यास दोन्ही अर्थव्यवस्थांना लाभदायक ठरणाऱ्या नवीन मूल्यसाखळ्या विकसित करता येतील, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  GDPच्या नव्या मालिकेत मोठे बदल; 2022-23 आधार वर्ष, मॅन्युफॅक्चरिंगसाठी ‘Double Deflation’चा वापर

जैवउत्पादनातील संयुक्त प्रकल्पांना चालना

प्रिसिजन फर्मेंटेशनवर आधारित जैविक रंग, पर्यायी प्रथिने, शैवालाधारित उत्पादने तसेच कृषी कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती यांसारख्या क्षेत्रांत मोठी क्षमता आहे. ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी महाराष्ट्रात प्रायोगिक प्रकल्प सुरू करून त्याचे उत्पादन आणि विस्तार करावा, असे आवाहन मंत्री रावल यांनी केले.

यासोबतच महाराष्ट्रातील कंपन्या आणि संशोधकांना ऑस्ट्रेलियातील बाजारपेठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टास्क फोर्समुळे गुंतवणुकीला मिळणार गती

प्रस्तावित ‘महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’च्या माध्यमातून संयुक्त प्रकल्पांची निवड, नियामक समन्वय आणि दोन्ही दिशेने होणाऱ्या गुंतवणुकीला गती देण्याचे नियोजन आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील अन्न व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील नियामक संस्था तसेच संशोधन संस्थांमध्ये अधिक दृढ सहकार्य निर्माण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

केवळ ऑस्ट्रेलियन गुंतवणूक महाराष्ट्रात आणणे हे उद्दिष्ट नसून तंत्रज्ञान, व्यापार, संशोधन आणि गुंतवणुकीची द्विपक्षीय भागीदारी विकसित करणे हा या सहकार्याचा मुख्य हेतू असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची उपस्थिती

बैठकीस केंद्र शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) क्षेत्रीय संचालक प्रीती चौधरी, उद्योग विकास आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, मुंबईतील ऑस्ट्रेलियाचे उपमहावाणिज्यदूत ख्रिश्चन जॅक यांच्यासह ऑस्ट्रेलियन जैवउत्पादन क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांनी प्रस्ताविकात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची माहिती दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button