झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही; मूलभूत सुविधांनी जीवनमान उंचावणार : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूरमधील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या प्रवासाचे ‘फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी’ पुस्तकातून दस्तावेजीकरण

नागपूर : झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र, केवळ मालकी हक्काचे पट्टे देऊन सरकार थांबणार नाही. झोपडपट्टी वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे मालकी पट्टे मिळवून देण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि त्याअनुषंगाने घेतलेल्या निर्णयांचा प्रवास मांडणाऱ्या सीएफएसडीच्या लीना बुद्धे लिखित ‘फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी : बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘रामगिरी’ येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मालकी हक्कामुळे झोपडपट्टीधारकांच्या जीवनात बदल
झोपडपट्टीतील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे मिळणे अत्यंत आवश्यक होते. हे पट्टे दिल्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला असून, आता त्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
झोपडपट्टी विकासाच्या दृष्टीने हे पुस्तक दिशादर्शक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. आपण नागपूरचे महापौर असतानाच या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यानंतर आमदार म्हणूनही हा विषय सातत्याने लावून धरला. मुख्यमंत्री झाल्यानंतर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला.
नागपूरमध्ये अनेक खासगी जागांवरही झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यांच्या नियमितीकरणासाठीही शासनाने निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे पुस्तकाच्या माध्यमातून दस्तावेजीकरण झाल्याबद्दल फडणवीस यांनी लेखिका लीना बुद्धे यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा – बालकांना संविधानिक हक्कांची ओळख करून देणारे ‘18 मूलभूत हक्क’ कलरिंग बुक
१२ ते १५ हजार मालकीपट्ट्यांचे वाटप
नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याची भावना लेखिका लीना बुद्धे यांनी व्यक्त केली.
झोपडपट्टीधारकांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नाची दखल घेत ठोस निर्णय घेतल्यामुळे रहिवाशांना मालकी हक्क मिळण्याचा मोठा दिलासा मिळाला. हा संपूर्ण प्रवास पुस्तकात मांडण्यात आला आहे. नागपूर शहरात आतापर्यंत १२ ते १५ हजार मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले असून, हे मोठे कार्य असल्याचे बुद्धे यांनी सांगितले.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, डॉ. सुहास बुद्धे, सीएफएसडीतील डॉ. बुद्धे यांचे सहकारी आणि आप्तेष्ट उपस्थित होते.





