नाशिककरांसाठी मोठी खुशखबर! शहराच्या रस्त्यावर धावणार ५० ई-बसेस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; पर्यावरणपूरक प्रवासासोबत वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत

नाशिक : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत ५० ई-बसेस नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसेसमुळे नागरिकांना विश्वासार्ह, आरामदायी आणि दर्जेदार सार्वजनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
१२ मीटर लांबीच्या ई-बसेस शहरात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२ मीटर लांबीच्या ५० ई-बसेस आता शहरात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक ई-बसेसचा समावेश झाल्यामुळे नागरिकांना अधिक विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास खासगी वाहनांवरील नागरिकांचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. परिणामी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही या ई-बसेस महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – पनवेलमध्ये मतदारयादी पुनरीक्षणाच्या गोपनीय प्रपत्रांची झेरॉक्स!
डिझेल बसेसच्या तुलनेत परिचालन खर्चात बचत
ई-बसेसचा वापर केल्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या बसेसच्या तुलनेत परिचालन खर्चातही बचत होणार आहे. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यास मदत होऊन नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक होणार आहे.
नाशिक शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची प्रवासाची गरज लक्षात घेऊन भविष्यात आणखी ई-बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक व्यापक आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे.
ई-बसेसच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक वाहतूक आणि नागरिकांना दर्जेदार प्रवास सुविधा यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने ५० ई-बसेसचे लोकार्पण हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.





