इनसाइट २०२६’ मधून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला राष्ट्रीय व्यासपीठ एमआयटी आळंदीत राष्ट्रीय बहुविषयक ऑनलाइन परिषदेचे यशस्वी आयोजन

आळंदी : येथील एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कार्यरत असलेल्या सायन्स-टेक क्लब, अॅफ्लेटस क्लब आणि संशोधन व विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इनसाइट २०२६’ या राष्ट्रीय बहुविषयक ऑनलाइन संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला विद्यार्थी व संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिषदेसाठी एकूण २०४ संशोधन लेख प्राप्त झाले असून त्यात ६४० लेखकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये एमआयटी महाविद्यालयाचे ५०१ तर विविध बाह्य संस्थांमधील १३७ लेखकांचा समावेश आहे.
हेही वाचा – CNG पुन्हा महागला; चार महिन्यांत तब्बल 10 रुपयांची वाढ, महाराष्ट्रातही दरवाढीची शक्यता
प्राप्त झालेल्या सर्व लेखांचे मूल्यमापन आठ बाह्य परीक्षकांमार्फत करण्यात आले. परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री. रामकिशन अग्रवाल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या विषयावर बीजभाषण केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थी व संशोधकांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नव्या संधी आणि आव्हानांबाबत सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी सायन्स-टेक क्लब, अॅफ्लेटस क्लब आणि संशोधन व विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले. संशोधन वृत्तीस चालना देणाऱ्या अशा उपक्रमांना संस्थेचे सातत्याने पाठबळ राहील, असेही त्यांनी नमूद केले. परिषदेचे संयोजक डॉ. सुनील महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कीर्ती रासकर व श्रीमती शीतल शेवकरी यांनी सहसंयोजक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांना संशोधन सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि बहुविषयक ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे हा परिषदेचा उद्देश यशस्वी झाल्याचे संयोजकांनी सांगितले.




