खारघरमध्ये SIR फॉर्मवरून राजकीय राडा; 35 हजार फॉर्म जप्त, 5 BLO प्रतिनिधींवर कारवाई
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा झेरॉक्स दुकानात गोंधळ; रोहित पवारांची मागणी—‘BLOंना आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा’

नवी मुंबई : खारघरमध्ये SIR फॉर्मच्या झेरॉक्सवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. एका झेरॉक्स दुकानात मोठ्या प्रमाणात SIR फॉर्मची छपाई सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानात धाव घेतली. यावेळी फॉर्म झेरॉक्ससाठी घेऊन आलेली व्यक्ती भाजपचा युवा पदाधिकारी असल्याचे समोर आल्याने ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली.
या प्रकरणाची दखल घेत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पाच BLO प्रतिनिधींवर निलंबनाची कारवाई केली असून पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. भाजप कार्यकर्ता सुरज पाटील याच्याकडून सुमारे 35 हजार SIR अर्ज ताब्यात घेऊन सील करण्यात आल्याची माहिती आहे.
खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात हजारो SIR फॉर्म झेरॉक्स केले जात असल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी दुकानात जाऊन याबाबत चौकशी केली. फॉर्म झेरॉक्ससाठी घेऊन आलेली व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि झटापट झाली.
घटनेनंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खारघर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत भाजप कार्यकर्ता सुरज पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात सुरज पाटील याच्याकडून 35 हजार SIR अर्ज ताब्यात घेऊन सील करण्यात आले आहेत. तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पाच BLO प्रतिनिधींवर निलंबनाची कारवाई केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा – धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर बंधू आमनेसामने; मकरंदराजेंचे ओमराजेंना थेट आव्हान
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत केवळ BLOंवर कारवाई करून चालणार नाही, अशी भूमिका मांडली. BLOंना हे काम करण्याचे आदेश देणारे अधिकारी कोण आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
भाजप कार्यकर्त्यावरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले. जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार समोर आला म्हणून कारवाई झाली; मात्र असे अनेक प्रकार उघडकीस आले नसतील तर त्याचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
SIR फॉर्मच्या प्रक्रियेत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात फॉर्मची झेरॉक्स का करण्यात आली, याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. केवळ निलंबनाची कारवाई न करता या संपूर्ण प्रकरणामागील यंत्रणा आणि जबाबदार व्यक्तींची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खारघरमध्ये राजकीय वातावरण तापले असून SIR फॉर्मच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.





