ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: राजकीय मुद्द्यांना बगल देत महापालिका प्रशासनाचे शहरविकासाला प्राधान्य!

सप्टेंबरमध्ये नियोजित सभा 15 दिवस आधीच बोलावली! : तहकूब सभा नियोजनाप्रमाणे 17 सप्टेंबरला होणार!

पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी: राजकीय वाद-विवादांना बाजूला सारत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहर विकासाला प्राधान्य दिले असून, त्याचाच एक भाग म्हणून सप्टेंबरमधील नियोजित सर्वसाधारण सभा तब्बल १५ दिवस आधीच, म्हणजे २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यामुळे प्रस्तावित विकासकामांना गती मिळणार असून, प्रशासनाच्या या तत्परतेचे शहरातून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित सभासुद्धा होणारच आहे.

दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् गीताच्या सन्मानार्थ सभागृहाने ती सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुढील नियमित सभा थेट १७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार, असे निश्चित करण्यात आले होते. मात्र यामुळे भामा आसखेड व निगडी जलशुद्धीकरण प्रकल्प, भोसरी स्मशानभूमी विद्युत दाहिनी, मोशी दुर्घटनाग्रस्तांना अर्थसहाय्य, अप्पू घर नूतनीकरण यांसारख्या अनेक तातडीच्या व जनहिताच्या विषयांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान, ग.दि. माडगुळकर नाट्यगृह येथे शहरातील प्रस्तावित पार्किंग पॉलिसी, स्वच्छतागृह नियोजन आणि मेट्रो विस्ताराबाबतच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना नोंदवल्या. त्यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, विकासकामांना प्राधान्य दिले आणि नगरसचिव कार्यालयाने पुढाकार घेत सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरऐवजी २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रलंबित असलेले तब्बल २१ महत्त्वाचे विषय पंधरा दिवस आधीच निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसारख्या राजकीय मुद्द्यांवरून सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब होत असल्याचे चित्र होते. मात्र यावेळी प्रशासनाने व सभागृह नेतृत्वाने राजकीय वादांना बगल देत शहर विकासाला प्राधान्य दिल्याचे यातून स्पष्ट होते. पाणीपुरवठा प्रकल्पांसाठीची वाढीव तरतूद, सार्वजनिक शौचालय धोरण, पार्किंग धोरण, शाळांमधील सुरक्षा यंत्रणा यांसारखे थेट नागरिकांशी निगडित विषय आता विनाविलंब मार्गी लागणार आहेत.

वादग्रस्त प्रस्तावावर दि.१७ सप्टेंबरला चर्चा…

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय हा प्रशासकीयदृष्ट्या अतांत्रिक असूनही केवळ राजकीय स्वरूपाचा असल्याने, गेल्या काही महिन्यांपासून याच एका मुद्द्यावरून सभागृहात वारंवार वादंग निर्माण होत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव गेल्या सर्वसाधारण सभेतही मार्गी लागू शकला नाही. भाजपचे ८४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ३७ असे बलाबल असल्याने भाजपला ७ व राष्ट्रवादीला ३ जागा मिळणार आहेत. राष्ट्रवादीने आपली तीन नावे आधीच सादर केली आहेत, मात्र भाजपाअंतर्गत सात नावांची प्रस्ताव अद्याप झालेला नाही. त्यामुळे स्वीकृतचा प्रस्ताव अपूर्ण आणि अर्धवट प्रस्ताव सविस्तर पूर्ण प्रस्ताव सादर करण्याची भूमिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाने घेतल्याचे दिसत आहे.

फेब्रुवारीपासून सुरू असलेला हा वाद जून महिन्याच्या सभेत विषय दप्तरी दाखल करून ‘सोडवण्यात’ आला होता. महापौर रवी लांडगे यांच्या पत्रानुसार हा विषय पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या सभेच्या पहिल्याच क्रमांकावर आणण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष सभेच्या दिवशी भाजपाने अंतर्गत नावे निश्चित न झाल्याचे कारण देत विषय पुन्हा तहकूब केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला, अखेर महापौरांना सभाच तहकूब करावी लागली.

यामुळे शहरहिताच्या इतर महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा व निर्णयप्रक्रिया विनाकारण रखडत होती. ही बाब लक्षात घेत, अपूर्ण व अर्धवट स्वरूपात असलेला हा प्रस्ताव तूर्त बाजूला ठेवण्याची भूमिका सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. यामुळे यापुढे सभागृहाचा वेळ व ऊर्जा शहर विकासाच्या ठोस विषयांवर केंद्रित होणार आहे. दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या सभेत यावर चर्चा होणार आहे.

‘वंदे मातरम्‌ ’च्या सन्मानार्थ आम्ही सभा तहकूब केली. त्यावर विकासकामे लांबणीवर पडली, असा दावा काही सदस्यांनी केला. शहर विकासाला पहिले प्राधन्य या सूत्रानुसार आम्ही सप्टेंबरमधील नियोजित सभा महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी घेतली. यामध्ये पार्किंग पॉलिसी, सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण आणि मेट्रो विस्तार याबाबत चर्चा होईल. तसेच,
“स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय हा निव्वळ राजकीय स्वरूपाचा असून, तो अद्याप अपूर्ण व अर्धवट अवस्थेत आहे. अशा एका मुद्द्यामुळे शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, पायाभूत सुविधा यांसारख्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा निर्णय रखडून ठेवणे योग्य नाही. त्यामुळे तहकूब सभेच्या अजेंड्यावर हा विषय होता. ती सभा दि. १७ सप्टेंबरला होणार आहे. सभागृहात राजकारणापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा, ही आमची भूमिका कायम राहील.

  • प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group