TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंढेंच्या FDAचा मुंबईत पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’; चार अन्न आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित

स्वच्छता, अन्नसाठवणूक आणि ड्रेनेज व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर FDAची धडक कारवाई

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) धडक कारवायांचा सिलसिला महिन्याभरापासून सुरू असून, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर आता मुंबईतील आणखी चार अन्न आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

FDAच्या तपासणीदरम्यान या आस्थापनांमध्ये स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, अन्नपदार्थांची साठवणूक तसेच क्रॉस-कंटॅमिनेशन रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत चारही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.

FDAच्या पथकाने कांदिवली येथील गरवारे इन्स्टिट्यूट कॅम्पसमधील अक्षय कोर्ट्स, BKC परिसरातील Craftpac Hospitality Pvt. Ltd., दादर पश्चिम येथील मे. मारियन हॉटेल अँड रेस्टॉरंट तसेच चेंबूरच्या टिळक नगरमधील मे. भगवती स्टोअर्स येथे तपासणी केली.

तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. स्वच्छतेची स्थिती, ड्रेनेज व्यवस्था, अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांमधील संभाव्य क्रॉस-कंटॅमिनेशन रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले.

तपासणीतील त्रुटींची गंभीर दखल घेत FDAने संबंधित चारही आस्थापनांचे FSSAI परवाने तत्काळ निलंबित केले आहेत. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

हेही वाचा –  जपानी संशोधकांची भात लागवडीतील जलव्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी शहा फार्म्स ॲग्री टुरिझमला भेट

यापूर्वी काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित तीन अन्न आस्थापनांवरही FDAने कारवाई केली होती. परमिट रूम, पॅव्हिलियन आणि मेडिटेरियन या तीन आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्यानंतर त्यांचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले होते.

मुंबईतील अन्न आस्थापनांवर सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर खाद्य व्यवसायिकांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सतर्कता वाढली आहे.

FDAने यापूर्वी राज्यातील विविध मोठ्या फूड जॉइंट्स आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांचीही तपासणी केली होती. या तपासणीनंतर Blinkit, Zepto आणि Swiggy Instamart यांच्याशी संबंधित १४ फूड बिझनेस केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती होती.

या तपासण्यांमध्ये खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, अन्नसुरक्षेशी संबंधित नोंदी, परवान्याचे प्रदर्शन तसेच FIFO (First In, First Out) या इन्व्हेंटरी व्यवस्थापन नियमांचे पालन होत आहे का, याची तपासणी करण्यात आली होती.

FDAच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर पुढील काळातही कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button