गणेशोत्सवाची मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे संदीप देशपांडेंचे आवाहन
गणेशोत्सव मंडळांनी परंपरा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य द्यावे; वाढत्या कॉर्पोरेट सहभागावर व्यक्त केली चिंता

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाला वाढते कॉर्पोरेट स्वरूप आणि उद्योगपतींचा वाढता सहभाग यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘लालबागचा राजा’ मंडळावर जोरदार टीका केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या संस्कृतीशी जोडलेला सण असून, तो कॉर्पोरेट वॉरचा भाग होता कामा नये, असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे यांनी गणेशोत्सवातील उद्योगपतींच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले. “मराठी सण आपण आता गुजराती कंपन्यांच्या हाती देणार आहोत का?” असा सवाल त्यांनी केला.
देशपांडे म्हणाले की, गणेशोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी निधी आवश्यक असला तरी मोठ्या गणेश मंडळांकडे भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या येतात. त्यामुळे उद्योगपतींना सल्लागार म्हणून नियुक्त करण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता; १५०० रुपये थेट खात्यात जमा होणार
‘उद्या गणेशोत्सव कॉर्पोरेट वॉरचे ठिकाण होईल का?’
लालबागचा राजा मंडळाशी संबंधित निर्णयांचा संदर्भ देत देशपांडे यांनी भविष्यात इतर मोठ्या कंपन्यांचाही गणेशोत्सवात सहभाग वाढण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे गणेश मंडळांना कॉर्पोरेट स्पर्धेचे केंद्र बनवायचे आहे का, असा सवाल त्यांनी केला.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि मराठी माणसाच्या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे गणपती उत्सवाचा वापर केवळ ब्रँडिंग किंवा मार्केटिंगसाठी होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
गणेशोत्सव मंडळांनी आत्मपरीक्षण करावे
सर्व मराठी गणेशोत्सव मंडळांनी या विषयावर गांभीर्याने विचार करून आत्मपरीक्षण करावे, असे आवाहनही देशपांडे यांनी केले. भविष्यात पारंपरिक गणेशोत्सवाची ओळख बदलून तो उद्योगपतींच्या नावाने ओळखला जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी मंडळांनी सावध भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव, मोठ्या मंडळांचा वाढता व्यावसायिक सहभाग आणि उद्योग क्षेत्राशी असलेले संबंध यावर नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता आहे.





