‘प्रो गोविंदा’ला जागतिक व्यासपीठावर नेणार; ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचे प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; प्रो गोविंदा लीग २०२६च्या चौथ्या सिझनला वरळीत दिमाखात सुरुवात

मुंबई : महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मुंबईची ओळख असलेल्या गोविंदा खेळाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून हा साहसी खेळ देशभर पोहोचला असून, त्याला अखिल भारतीय स्तरावर मान्यता मिळवून देत एशियाड, कॉमनवेल्थ आणि पुढे ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वरळी येथील एस.व्ही.पी. स्टेडियममध्ये प्रो गोविंदा लीग २०२६च्या चौथ्या सिझनचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार रणजीत पाटील, लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि शायना एन. सी. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आधुनिक आणि व्यावसायिक क्रीडा स्पर्धेचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने प्रो गोविंदा लीग सुरू करण्यात आली. मानवी मनोरे रचण्याच्या खेळासाठीची ही देशातील पहिली व्यावसायिक लीग म्हणून ओळखली जाते.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता; १५०० रुपये थेट खात्यात जमा होणार
दहीहंडी हा केवळ उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक अभिसरणाचा संदेश देणारा उपक्रम आहे. गोविंदा एकमेकांना आधार देत मानवी साखळी तयार करून हंडी फोडतात. एकीच्या बळावर मोठे कार्य साध्य करता येते, हा संदेश या खेळातून मिळतो, असे फडणवीस यांनी सांगितले.
गोविंदा खेळाला ऑलिम्पिक असोसिएशन तसेच संबंधित क्रीडा संघटनांची मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यानंतर हा खेळ एशियाड, कॉमनवेल्थ आणि अखेरीस ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी शासन आवश्यक ते सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्य शासनाने दहीहंडी अर्थात प्रो गोविंदा खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. २०२३ पासून गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येत असून, यावर्षी विमा संरक्षणाचा विस्तार करून १ लाख ६० हजार गोविंदांना विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदाच्या प्रो गोविंदा लीगमध्ये १६ संघ आणि सुमारे ३,२०० गोविंदांचा सहभाग आहे. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून, विविध संघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व गोविंदा पथके, प्रशिक्षक आणि सहभागी गोविंदांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





