मंत्रालयातील ‘एकाच खुर्ची’वर वर्षानुवर्षे बसलेले अधिकारी रडारवर; ३१४ जणांची यादी तयार
मुख्यमंत्री कार्यालयाची मोठी कारवाई; दहा-दहा वर्षे एकाच विभागात ठाण मांडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना इतर खात्यांत हलवण्याची तयारी

मुंबई : मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांमध्ये वर्षानुवर्षे एकाच पदावर किंवा विशिष्ट खात्यात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची आता झाडाझडती सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने अशा ३१४ अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून, त्यांना तत्काळ इतर विभागांमध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंत्रालय आणि राज्य सरकारच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काही अधिकारी तब्बल दहा-दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. काही अधिकारी राजकीय वरदहस्त आणि विभागातील वरिष्ठांशी असलेल्या संबंधांच्या जोरावर एकाच विभागात दीर्घकाळ ठाण मांडून असल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्रालयातील अशा अधिकाऱ्यांची कसून छाननी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, काही अधिकारी मधल्या काळात अन्य विभागात बदली होऊन काही कालावधीनंतर पुन्हा आपल्या जुन्याच विभागात परत येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांचीही तपासणी करून संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – गडकिल्ले, मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला वेग; ३ टक्के निधीला २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ
यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीशिवाय मंत्र्यांच्या आस्थापनेवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता त्यानंतर मंत्रालयातील दीर्घकाळ एकाच पदावर किंवा विभागात असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे.
सध्या ३१४ अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली असली तरी, या मोहिमेत आणखी काही अधिकारी रडारवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात होणाऱ्या बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या कारवाईमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढविणे, एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहणाऱ्या अधिकाऱ्यांची मक्तेदारी कमी करणे आणि प्रशासनाला अधिक गतिमान बनवणे, हा मुख्यमंत्री कार्यालयाचा उद्देश असल्याचे मानले जात आहे.





