Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत ‘माझगांवचा मोरया’च्या आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याने तणाव; रात्रभर ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई | मुंबईतील प्रसिद्ध ‘माझगांवचा मोरया’ बाप्पाच्या आगमन सोहळ्याला रविवारी गालबोट लागले. मूर्ती मंडपाजवळ पोहोचत असतानाच एका इमारतीतून मिरवणुकीवर अंडी फेकल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त भाविकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

माझगांव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘माझगांवचा मोरया’चा आगमन सोहळा एलफिन्सटन येथील मूर्तिकाराच्या कारखान्यातून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाला होता. मिरवणूक मंडपापासून अवघ्या काही मीटर अंतरावर आली असताना शेजारच्या इमारतीवरून बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आली. या खोडसाळ प्रकारामुळे भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

हेही वाचा

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या कायापालटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडमॅप

भाविकांचा रात्रभर ठिय्या आणि घोषणाबाजी

घटनेची माहिती पसरताच घटनास्थळी शेकडो गणेशभक्त जमा झाले आणि त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देत आणि आरती करत तीव्र विरोध दर्शवला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांकडून गुन्हा दाखल; २४ तासांत कारवाईचे आश्वासन

सुरुवातीला आरोपीला अटक केल्याशिवाय हटणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि २४ तासांच्या आत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. पोलिसांच्या मध्यस्थी व आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले असून परिसरात सध्या शांतता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button