महाराष्ट्र केसरी २०२६-२७ची लढत नागपुरात; महिला महाराष्ट्र केसरी वाशिममध्ये
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; राज्यातील ४२ जिल्हा संघांचे प्रतिनिधी उपस्थित

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे येथे उत्साहात पार पडली. या सभेत २०२६-२७ ची वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची लढत नागपूर येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन वाशिम येथे करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
पुनावळे येथील हॉटेल ब्लू वॉटर येथे दुपारी १२ वाजता झालेल्या या सभेला राज्यातील ४२ जिल्हा कुस्तीगीर संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रातील कुस्तीच्या भविष्यासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
सभेतील ठरावानुसार वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठीची २०२६-२७ची स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वाचे लक्ष आता नागपूरकडे लागले आहे. राज्यातील नामांकित मल्लांसह नवोदित कुस्तीपटूंनाही या स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्याची मोठी संधी मिळणार आहे.
याचबरोबर महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा वाशिम येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील महिला कुस्तीपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
हेही वाचा – रिक्षाचालकांसाठी मोठी बातमी! मराठी शिकण्यासाठी महिनाभराची संधी; न शिकल्यास परवाना निलंबित होणार
‘मिशन लक्षवेध’ योजनेत बदलासाठी शासनाकडे पाठपुरावा
सभेमध्ये शासनाच्या ‘मिशन लक्षवेध’ योजनेबाबतही सविस्तर चर्चा झाली. कुस्तीगीर संघाने मांडलेल्या प्रस्तावानुसार या योजनेमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संघाचे पदाधिकारी मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कुस्तीपटूंना अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, स्पर्धांच्या संधी आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्यात कुस्तीच्या विकासाशी संबंधित विविध धोरणे राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. आगामी काळात अधिकाधिक राज्यस्तरीय व इतर स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण तसेच शहरी भागातील कुस्तीपटूंना संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या वार्षिक सर्वसाधारण सभेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा खासदार रामदासजी तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, उपाध्यक्ष हनुमंत गावडे, संजय तीरथकर, विलास कथुरे, सरचिटणीस योगेश दोडके, भारत केसरी विजय गावडे, तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे संतोष माचुत्रे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले, तर काळुराम कवितके यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.





