Gen Z कडे भाजपचा फोकस; फडणवीसांचा ‘युवा कनेक्ट’ मजबूत करण्यासाठी नवी रणनीती
‘युथ फॉर मंथन’, ‘कॅम्पस कनेक्ट’ आणि ‘मुख्यमंत्री फेलोशिप’मधून तरुणांशी थेट संवाद; रोजगार, कौशल्यविकास आणि विकासाच्या मुद्द्यांवर भर

मुंबई : राज्यातील तरुण वर्गाशी थेट संवाद वाढवण्यासाठी भाजपने युवा-केंद्रित रणनीतीला अधिक व्यापक स्वरूप दिल्याचे चित्र आहे. ‘युथ फॉर मंथन’, ‘कॅम्पस कनेक्ट’, ‘मुख्यमंत्री फेलोशिप’, रोजगार मेळावे आणि डिजिटल माध्यमांद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा Gen Z आणि Gen Alphaशी संवाद वाढवण्यावर भर दिला जात आहे.
जंतरमंतरवरील तरुणांच्या आंदोलनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’सारख्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता तरुणांच्या प्रश्नांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही रोजगार, कौशल्यविकास, स्टार्टअप, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांसारखे मुद्दे पुढे केले जात आहेत.
जुलै २०२५ मध्ये वरळी येथे फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या युवा संवाद कार्यक्रमातून ‘युवा कनेक्ट’ची सुरुवात झाली होती. विविध क्षेत्रांतील तरुणांशी थेट संवाद साधण्यावर त्यावेळी भर देण्यात आला होता. आता ‘तिरंगा रॅली’, ‘युथ फॉर मंथन’ आणि ‘कॅम्पस कनेक्ट’ यांसारख्या उपक्रमांतून हा संवाद अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न होत आहे.
भाजपची तरुणांशी जोडण्याची रणनीती यापूर्वीही ‘एक बूथ, टेन यूथ’, ‘नमो नवमतदार’ आणि सोशल मीडिया वॉरियर्स यांसारख्या मोहिमांमधून राबवली गेली आहे. मात्र, सध्याची रणनीती केवळ युवा कार्यकर्त्यांची फळी उभारण्यापुरती मर्यादित नसून, कॅम्पस, डिजिटल मीडिया, रोजगार मेळावे आणि युवा आयकॉनच्या माध्यमातून विविध स्तरांवर तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
हेही वाचा – स्वदेशा हाऊसिंग सोसायटीत स्वच्छतेसाठी श्रमदानाचा आदर्श
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्या मते, पक्ष कायमच तरुणांशी जोडलेला आहे. पूर्वी ‘युवा’, ‘नमो नवमतदार’ किंवा ‘मीडिया वॉरियर्स’ अशी या संपर्काची रूपे होती; आता त्याला ‘Gen Z’ असे संबोधले जाते, एवढाच फरक असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांमधील बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि शिक्षणाच्या प्रश्नांवरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून तरुणांच्या रोजगार आणि भविष्यासाठी काम करणारे सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षण आहे.
फडणवीस यांच्या युवा संवादामध्ये रोजगार, कौशल्यविकास, स्टार्टअप, तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील सुमारे ३.२५ कोटी तरुण राज्याला एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी मांडणीही करण्यात आली आहे.
‘कॅम्पस कनेक्ट’, युवा संसद, क्रीडा स्पर्धा, पर्यावरणविषयक उपक्रम आणि सोशल मीडिया मोहिमांच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या सक्रिय नसलेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘नमो चषक’सारख्या क्रीडा उपक्रमांपासून डिजिटल रील्सपर्यंत या संपर्काची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फेलोशिपच्या माध्यमातून उच्चशिक्षित तरुणांना प्रशासनाच्या कामाशी जोडण्यावरही भर आहे. सोशल मीडिया हे Gen Zपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे माध्यम असल्याने डिजिटल संवादालाही विशेष महत्त्व दिले जात आहे.
तरुणांमधील नाराजी आणि त्यांच्या प्रश्नांमुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष Gen Zकडे वळले आहे. सांस्कृतिक अभिमान, राष्ट्रवाद, अमली पदार्थविरोधी मोहीम, रोजगार आणि तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मुद्दे भाजपच्या युवा संवादाचा भाग बनले आहेत.
त्यामुळे भाजपच्या दीर्घकालीन युवा संपर्क रणनीतीला फडणवीस यांच्या वैयक्तिक ‘युवा कनेक्ट’ची जोड देऊन नव्या पिढीशी नाते मजबूत करण्याचा हा प्रयत्न आगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कितपत प्रभावी ठरतो, याकडे लक्ष लागले आहे.





