संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांना ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार’

मुंबई | प्रतिनिधी
वारकरी संप्रदायाचे भूषण, संतपीठाचे संचालक तथा संतसाहित्य, कीर्तन, अध्यात्म आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. राजू शिवाजी ढोरे महाराज यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी वाशी, नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित दीक्षांत एवं पुरस्कार प्रदान समारोहात हा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सच्चिदानंद जोशी उपस्थित होते.
संपूर्ण भारतातून केवळ दहा मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, महाराष्ट्रातून हा सन्मान मिळविणारे ह.भ.प. राजू महाराज ढोरे हे एकमेव मानकरी ठरले आहेत.
ह.भ.प. राजू महाराज ढोरे हे संत तुकाराम महाराजांच्या परंपरेशी जोडलेले आध्यात्मिक विचारवंत आणि कीर्तनकार म्हणून कार्यरत आहेत. कीर्तन, प्रवचन, भजन तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. संत साहित्य, संत विचार आणि वारकरी संस्कृतीचा प्रसार करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.

हेही वाचा
त्यांच्या मार्गदर्शनाखाली संतपीठ हे संत विचार, कला, शास्त्रीय संगीत, वारकरी परंपरा आणि भारतीय संत संस्कृतीच्या संवर्धनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून कार्यरत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसह संत परंपरेचा विचार आणि वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संतपीठाच्या माध्यमातून सुरू आहे.
त्यांच्या संतसेवा, कलासाधना आणि सामाजिक-सांस्कृतिक योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक कार्यासोबतच संतपीठ, वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेच्या सेवेलाही मिळालेला राष्ट्रीय स्तरावरील गौरव मानला जात आहे.
पुरस्कार स्वीकारताना उपस्थित मान्यवरांनी ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास संतपीठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांच्यासह शिक्षक अविनाश भोगील, महेश शेलके, चंद्रकांत गोसावी, विलास कोकाटे, नेहा नाफडे, सुचेता पुजारी, अर्चना देसाई, शोभा जगताप, गौरी हाडके, प्रियांका कोंडेकर, हिरल गोरे, शंभुदेव गायकवाड, संतोष खोटे, चेतन सपकाळ, अखिल पोखरकर तसेच महाराजांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.




