TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर FSSAIची मोठी कारवाई

नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह कंपन्यांना १५० हून अधिक नोटिसा

मुंबई : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे दावे आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) अलिकडच्या काही महिन्यांत अन्न क्षेत्रातील कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. प्रमुख ब्रँड्ससह विविध अन्न व्यावसायिकांना १५० हून अधिक नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती FSSAIने दिली आहे.

FSSAIने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या अलीकडील अंमलबजावणी कारवाईची माहिती दिली. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे दावे आणि लेबलिंग नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधित कंपन्यांविरोधात नोटिसा बजावण्यात आल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.

FSSAIने कारवाई केलेल्या काही प्रमुख कंपन्यांची यादीही जाहीर केली आहे. यामध्ये नेस्ले इंडिया, पेप्सिको, अ‍ॅबॉट इंडिया, रेड बुल इंडिया, डॅनन इंडिया, मॉन्स्टर एनर्जी इंडिया, हेल एनर्जी, मोंडेलीझ इंडिया, कोका-कोला इंडिया, डियाजिओ, पेरनोड रिकार्ड, फेरेरो इंडिया आणि केनव्ह्यू यांचा समावेश आहे.

अन्न सुरक्षा कायदे आणि नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी विविध फूड बिझनेस ऑपरेटरविरोधात कारवाई करण्यात आल्याचे FSSAIने सांगितले. ऊर्जा पेये आणि अल्कोहोलयुक्त पेये तयार करणाऱ्या कंपन्यांवरही नियामकाने कारवाई केली आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात प्रशिक्षण धोरण लागू; अधिकारी-कर्मचाऱ्यांना कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण

नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर अनेक कंपन्यांची उत्पादने जप्त करण्यात आल्याची माहिती FSSAIने दिली आहे. अन्न उत्पादनांवरील दावे, जाहिराती आणि लेबलिंगमध्ये ग्राहकांची दिशाभूल होणार नाही, यासाठी नियामकाकडून कारवाई करण्यात येत आहे.

अन्न उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीशी संबंधित प्रकरणांमध्ये अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला १२ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अ‍ॅमेझॉनच्या एका गोदामाचा परवानाही रद्द करण्यात आल्याचे FSSAIने सांगितले.

अन्न सेवा क्षेत्रातील कंपन्यांवरही FSSAIने कारवाई केली आहे. KFC, मॅकडोनाल्ड्स, पिझ्झा हट, डॉमिनोज आणि कोस्टा कॉफी यांसारख्या संस्थांना ३० हून अधिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

यामध्ये डॉमिनोजच्या पाच परवान्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहितीही FSSAIने दिली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी अनेक पंचतारांकित हॉटेलांनाही नियामकाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या.

FSSAIने या आठवड्याच्या सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, नोटिसा बजावल्यानंतर अनेक कंपन्यांनी नियमांचे पालन करण्यासाठी सुधारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्न उत्पादनांबाबत अचूक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी अन्न नियामकाकडून अशा कारवाया सुरू ठेवण्यात येणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button