महाराष्ट्र-हेसन भागीदारीला नवी दिशा; गुंतवणूक, रोजगार आणि कौशल्य विकासाला मिळणार चालना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसनचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांच्यात सामंजस्य करार; उद्योग, IT, कौशल्य विकास आणि सीमापार रोजगाराच्या संधींवर भर

मुंबई : जर्मनीतील हेसन राज्य आणि महाराष्ट्र यांच्यातील भागीदारी ही दोन आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्यांमधील सहकार्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र आणि हेसनमधील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसन राज्याचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी स्वाक्षरी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी यांच्यासह जर्मनीच्या हेसन राज्याचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
या करारामुळे हेसन हे महाराष्ट्रासाठी जर्मनी आणि युरोपमधील प्रवेशद्वार, तर महाराष्ट्र हे हेसनसाठी भारत आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
विश्वास, ज्ञान, व्यापार, नवोन्मेष आणि लोकांमधील संबंधांच्या भक्कम पायावर भारत-जर्मनी भागीदारी उभी आहे. राष्ट्रीय स्तरावरील सहकार्याला आता राज्यस्तरीय आर्थिक भागीदारीची जोड मिळत असून, महाराष्ट्र आणि हेसनची आर्थिक ताकद, औद्योगिक प्रगती आणि नवोन्मेष क्षमता यामुळे हे सहकार्य अधिक बळकट होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा – नवीन पोलीस ठाण्यांसाठी राज्य सरकारची सुधारित नियमावली; मागील तीन वर्षांतील गुन्हेगारीची आकडेवारी अनिवार्य
फ्रँकफर्ट हे युरोपमधील प्रमुख वित्तीय केंद्र, तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. वित्त, उद्योग, तंत्रज्ञान, संशोधन आणि कुशल मनुष्यबळ या क्षेत्रांतील सामर्थ्यामुळे फ्रँकफर्ट आणि मुंबई परस्परांच्या अर्थव्यवस्थांचे प्रवेशद्वार बनू शकतात, असे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राला जगातील अग्रगण्य गुंतवणूक आणि नवोन्मेष केंद्र बनविण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून, हेसनमधील उद्योगसमूह या प्रवासातील महत्त्वाचे भागीदार ठरू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
या सामंजस्य करारात उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान तसेच कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
औषधनिर्मिती, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, वाहन उद्योग, वित्तीय सेवा, लॉजिस्टिक्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या क्षेत्रांत व्यापक सहकार्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
हेसनमधील उद्योगांनी महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी, तसेच महाराष्ट्रातील उद्योगांनी जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी हेसनचा उपयोग करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास क्षेत्रातील सहकार्यालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नवी मुंबईजवळील एज्युकेशन सिटीमध्ये हेसनमधील अग्रगण्य विद्यापीठांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळाची वाढती गरज आणि महाराष्ट्रातील मोठा युवा वर्ग लक्षात घेता कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी दोन्ही राज्यांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
कराराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि हेसन येथे नियमित ‘महाराष्ट्र-हेसन बिझनेस डायलॉग’ आयोजित करण्याचा प्रस्तावही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला.
या भागीदारीमुळे उद्योग, गुंतवणूक, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रतिनिधीमंडळांची देवाणघेवाण, गुंतवणूकदारांना सहाय्य आणि नव्या व्यावसायिक संधी निर्माण होण्यास चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.





