ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड, हिंजवडी, ताथवडे व पुनावळेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करा

नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

पिंपरी : वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. या परिसरात अतिरिक्त पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करून वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची मागणी त्यांनी केली.

हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचारी, वाढती लोकसंख्या, राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेली वाहतूक, विविध ठिकाणी सुरू असलेली रस्ते विकासकामे आणि वाहनसंख्येतील सातत्याने होत असलेली वाढ यामुळे वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होत आहे.

वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी किमान ३० ते ५० अतिरिक्त पोलीस कर्मचारी तसेच आवश्यक संख्येने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

हेही वाचा –  नागपूरच्या मेडिकल-मेयोतील अत्याधुनिक सुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; विकासकामांबाबत समाधान

अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास प्रमुख चौक, जंक्शन, सर्व्हिस रोड, शाळा परिसर आणि आयटी पार्क परिसरातील वाहतूक अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येईल. तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक नियमन आणि पर्यायी मार्गांचे व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करता येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेविका श्रुती वाकडकर, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर, सहकारी नगरसेविका रेश्मा भुजबळ आणि चेतन भुजबळ उपस्थित होते. वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून नागरिकांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे श्रुती वाकडकर यांनी यावेळी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button