TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नागपूरच्या मेडिकल-मेयोतील अत्याधुनिक सुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; विकासकामांबाबत समाधान

पीआयसीयूतील व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पण; सर्पदंशग्रस्त बालिकेची विचारपूस करून उपचाराबाबत दिल्या सूचना

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची तसेच वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. दोन्ही रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत कामांचा वेग आणखी वाढविण्याच्या सूचना दिल्या.

राज्य शासनाकडून मेडिकल आणि मेयो या दोन्ही प्रमुख शासकीय रुग्णालयांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा विकसित करण्याचे काम सुरू आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेडिकल रुग्णालयातील एनआयसी आणि पीआयसीयू विभागाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते पीआयसीयूतील व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनी शस्त्रक्रियागृह आणि सर्जिकल आयसीयूचीही पाहणी केली.

अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रुग्णालयातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

हेही वाचा –  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी? सरकारचा प्रस्ताव विचाराधीन

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेतील एका विद्यार्थिनीवर नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बालिकेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी त्यांनी बालिकेच्या आईशी संवाद साधला तसेच डॉक्टरांना तिच्या उपचार आणि प्रकृतीबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आमदार मोहन मते आणि नगरसेवक रितेश गावंडे यावेळी उपस्थित होते.

मेडिकल रुग्णालयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. येथे सुरू असलेल्या मेडिकल ब्लॉक, सर्जिकल ब्लॉक आणि शस्त्रक्रियागृहाच्या विकासकामांची त्यांनी पाहणी केली.

मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. विकासकामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करतानाच कामांना आणखी गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button