खड्डा ठरला जीवघेणा! बालेवाडी-म्हाळुंगमध्ये ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे | बालेवाडी-म्हाळुंग परिसरात खराब रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात ११ वर्षीय ऋषभ पटोळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ऋषभ दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. त्यानंतर तो रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या आयशर टेम्पोखाली सापडला. या भीषण अपघातात ऋषभचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, बावधन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून, फरार टेम्पोचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा
महापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी तपासणी मोहीम
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बालेवाडी-म्हाळुंग परिसरातील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्ड्यांमुळे यापूर्वीही किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
ऋषभच्या मृत्यूमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, योग्य प्रकाशयोजना आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
रस्त्यावरील खड्डे केवळ गैरसोयीचे नसून ते थेट जीवघेणे ठरू शकतात, हे या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी खराब रस्त्यावर खड्ड्यांचा अंदाज घेत वेग कमी ठेवून आणि सुरक्षित अंतर राखून वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




