पिंपरी-चिंचवड महापालिका DP : रस्ते, कत्तलखाना अन् पूररेषेच्या आरक्षणांवर सर्वाधिक हरकती
पिंपरी-चिंचवडच्या सुधारित डीपीवर ५६ हजार ७७९ हरकती; १७ आरक्षणांवरच तब्बल ३७ हजार ४७९ आक्षेप

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावर (डीपी) नागरिकांचा मोठा आक्षेप नोंदला गेला आहे. सुधारित डीपीवर तब्बल ५६ हजार ७७९ हरकती दाखल झाल्या असून, त्यापैकी १७ आरक्षणे आणि प्रस्तावांवरच तब्बल ३७ हजार ४७९ हरकती आल्या आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यांचे रुंदीकरण, कत्तलखाना, दफनभूमी, विविध सार्वजनिक सुविधांची आरक्षणे आणि पूररेषेशी संबंधित प्रस्तावांना सर्वाधिक विरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महापालिकेकडे वर्ग झालेल्या क्षेत्राचा समावेश करून महापालिकेने सुधारित डीपी तयार केला आहे. शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या आराखड्यावर १५ मे २०२५ ते १४ जुलै २०२५ या ६० दिवसांच्या कालावधीत हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत शहरभरातून मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या.
पिंपरीतील आरक्षणांवर सर्वाधिक आक्षेप
सर्वाधिक हरकती पिंपरी येथील विविध आरक्षणांवर आल्या आहेत. पिंपरीतील म्युनिसिपल पर्पज, पोलिस स्टेशन आणि बस टर्मिनस या आरक्षणांवर एकत्रित ५ हजार ८३८ हरकती दाखल झाल्या आहेत. त्याखालोखाल तळवडे येथील घरजाई माता मंदिराजवळील २४ मीटर रुंद रस्त्याच्या प्रस्तावावर ४ हजार ४१८, तर चिखलीतील दफनभूमी आरक्षणावर ४ हजार ३१८ हरकती आल्या आहेत.
सांगवीतील दफनभूमीच्या आरक्षणालाही मोठा विरोध असून, त्यावर ४ हजार १२४ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. पिंपरीतील मैदान, प्रसूतिगृह, वाचनालय, माध्यमिक शाळा आणि इतर सार्वजनिक वापराच्या आरक्षणांवरही मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत.
मोशीतील कत्तलखान्यालाही विरोध
डीपीतील मोशी येथील कत्तलखाना आरक्षण हेही वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. या आरक्षणावर २ हजार ७५४ हरकती दाखल झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. किवळे येथील दफनभूमी आरक्षणावर २ हजार ४३५, तर चिखलीतील प्रस्तावित सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणांवरही मोठ्या संख्येने हरकती आल्या आहेत.
रस्ते रुंदीकरणाचे प्रस्तावही वादात
शहरातील विविध भागांतील १८ आणि २४ मीटर रुंदीच्या रस्त्यांच्या प्रस्तावांनाही नागरिकांचा विरोध असल्याचे हरकतींच्या संख्येतून स्पष्ट होते. थेरगाव येथील २४ मीटर रस्त्याच्या प्रस्तावावर २ हजार ९३९, पिंपरीतील प्रस्तावित रस्त्यावर ८००, चिंचवडमधील २४ मीटर रस्त्यावर ७०० आणि वाकडमधील १८ व २४ मीटर रस्त्यांच्या प्रस्तावावर ४९३ हरकती दाखल झाल्या आहेत.
याशिवाय चऱ्होलीतील स्टेडियम, घोरपडे पार्क, रहाटणीतील उद्यानाचा विस्तार आणि इतर सार्वजनिक आरक्षणांवरही नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत.
वर्षभरानंतर सुनावणीला सुरुवात
प्रारूप सुधारित डीपीवर दाखल झालेल्या हरकतींच्या सुनावणीला तब्बल वर्षभराच्या विलंबानंतर ३ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. सुनावणी समितीसमोर हरकतदारांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जात आहे. मात्र, मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे.
सुनावणी समिती या सर्व हरकतींचा विचार करून अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदविलेल्या रस्ते, कत्तलखाना, दफनभूमी, सार्वजनिक सुविधा आणि पूररेषेशी संबंधित आरक्षणांमध्ये बदल होणार का, याकडे आता पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या नोंदी…
सुधारित डीपीवर एकूण ५६,७७९ हरकती
१७ आरक्षणे/प्रस्तावांवर ३७,४७९ हरकती
सर्वाधिक आक्षेप पिंपरीतील सार्वजनिक वापराच्या आरक्षणांवर
रस्ते रुंदीकरणाच्या प्रस्तावांवरही मोठ्या प्रमाणात विरोध
मोशी कत्तलखाना आरक्षणावर २,७५४ हरकती
चिखली, सांगवी, किवळे येथील दफनभूमी आरक्षणांवरही हजारोंच्या संख्येने आक्षेप
३ ऑगस्टपासून हरकतींच्या सुनावणीला सुरुवात





