पुण्यात १२ दिवसांची दारूबंदी; मुंबई हायकोर्टाची प्रशासनाला फटकारणी, ‘ब्लँकेट बॅन’वर तीव्र नाराजी
‘प्रत्येक मद्यपान करणारी व्यक्ती कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेलच असे नाही’; नियमित मद्यपान करणाऱ्यांच्या आरोग्याचा मुद्दाही न्यायालयाने उपस्थित केला

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या १२ दिवसांच्या दारूबंदीवरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात मद्यविक्री दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाने जिल्हा प्रशासनाच्या सरसकट दारूबंदीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या आगमनाच्या दिवशी तसेच २५ आणि २६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुका पार पडेपर्यंत पुणे जिल्ह्यातील मिरवणूक मार्गांवरील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मात्र, केवळ पुणे जिल्ह्यातच अशा प्रकारे १२ दिवसांची दारूबंदी का करण्यात आली, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला केला. प्रत्येक मद्यपान करणारी व्यक्ती कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेलच असे नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाने ‘ब्लँकेट बॅन’वरही प्रश्न उपस्थित केला. अशा प्रकारच्या सरसकट बंदीमुळे नियमित मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यातून रुग्णालयांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने नमूद केले. कुठलाही ठोस तर्क नसताना अशा प्रकारचे सरसकट आदेश देता येणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा – ‘आत्महत्येविषयीची कथा बदलूया – संवादाची सुरुवात करूया’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दाही चर्चेत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भात नियमांचे पालन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लेझर लाईट आणि डीजेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
मध्यवर्ती पुण्यात जड वाहनांना प्रवेशबंदी
गणेशोत्सवातील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांना २४ तास प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात मिरवणुका, भाविकांची गर्दी आणि वाढती वाहतूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




