पुणे महापालिकेत मोठी खळबळ! उपअधीक्षक, वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिकांसह 407 कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या!
Pune PMC Transfer News: पुणे महापालिकेतील 407 कर्मचाऱ्यांच्या बदल्या, तीन वर्षांच्या निकषावर प्रश्न

पुणे : पुणे महानगरपालिकेत (PMC) मोठी प्रशासकीय हालचाल झाली असून एकाच वेळी तब्बल 407 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. या बदली प्रक्रियेमध्ये उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून अनेक कर्मचारी संभ्रमात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मतदार यादी पुनर्परीक्षण मोहीम (SIR) पूर्ण झाल्यानंतर या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र, त्याआधीच अचानक बदली आदेश काढण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन वर्षांचा निकष डावलल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप
महापालिकेतील बदली प्रक्रियेत पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांची एका ठिकाणी तीन वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे, त्यांना प्राधान्याने बदली करण्यात येते. मात्र, यावेळी काही कर्मचाऱ्यांची तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
तसेच, काही कर्मचारी अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असतानाही त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी संधी देण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
तक्रारींसाठी वेळ न मिळण्यासाठी घाईघाईने बदल्या?
या बदली प्रक्रियेबाबत काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बदली आदेशांवर हरकती किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू नये, यासाठी घाईघाईने निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
पुणे जिल्ह्यात यापूर्वी 285 महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या
दरम्यान, यापूर्वी पुणे जिल्ह्यातील 285 महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात समुपदेशन प्रक्रियेद्वारे ही बदली प्रक्रिया राबवण्यात आली होती.
पुणे पोलिस दलातही मोठे फेरबदल
पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागातही काही दिवसांपूर्वी मोठे फेरबदल करण्यात आले होते. खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबाराच्या घटनांनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक अजित जाधव यांचीही नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. येरवडा आणि लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यांसह इतर ठिकाणीही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.





