Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीची पायाभूत विकासकामे तातडीने सुरू करावीत’; उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून तेथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्याने संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, सिंधुदुर्गच्या नाधवडे येथील सुमारे ११.१४ हेक्टर एमआयडीसीची जमीन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन महामंडळाच्या ताब्यात असून संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वितरण पूर्ण झाले असून सातबारा नोंदीही एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. २०२२-२३ मध्ये तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचे अंदाजपत्रक आता कालबाह्य झाल्यामुळे त्याचा तातडीने फेरआढावा घेऊन सुधारित अंदाजपत्रक तयार करावे आणि मंजुरीसाठी त्वरित सादर करावे. सुमारे १५ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना विलंब न लावता प्रारंभ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या कामी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून वास्तववादी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश मंत्री डॉ.सामंत यांनी दिले. तसेच नाधवडे येथे प्रस्तावित ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रासाठी आवश्यक ४० गुंठे जमीन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याचेही मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांनी परिसरातील पाण्याच्या उगमस्थानाचे संरक्षण होईल, पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनीही पर्यावरणीय बाबींची पूर्ण दक्षता घेत औद्योगिक विकास करण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचा –  योगायोग नाही, तर एक संदेश…’ ! पंतप्रधान मोदींचा देशाला मोठा संदेश

मंत्री डॉ. सामंत यांनी प्रारंभी या औद्योगिक क्षेत्रामध्ये एमएसएमई उद्योगांसाठी प्लॉटिंग करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले. त्यामुळे अल्पावधीत अधिक उद्योग उभे राहतील, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि उद्योग विकासाला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील टप्प्यात मोठ्या उद्योगांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले की, नाधवडे औद्योगिक क्षेत्र राष्ट्रीय महामार्गालगत असून प्रस्तावित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग तसेच विद्यमान रेल्वे स्थानकाच्या निकट असल्याने या परिसराला उत्कृष्ट रस्ते व रेल्वे संपर्काचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात हे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचा विश्वास उद्योग मंत्री डॉ.सामंत आणि पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button