जनतेच्या विश्वासातूनच ऊर्जेचा स्रोत; ‘राजकारण नव्हे, तर माणसांचा प्रवास’: सुलक्षणा शिलवंत-धर
मिशन- PCMC : “संत तुकाराम नगरमध्ये ‘तुतारी’ला वाढते जनसमर्थन

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तासमीकरणे बदलत असतानाही, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी आपल्या प्रचाराचा केंद्रबिंदू राजकारण न ठेवता माणूस, नातेसंबंध आणि विश्वास यांवर ठेवला आहे. “उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आज प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. हे केवळ निवडणूक राजकारण नाही, तर समाजातील माणसांचे प्रेम, त्यांचे हास्य आणि आपण एकत्र पाहिलेल्या स्वप्नांचा हा प्रवास आहे,” अशी भावना त्या व्यक्त करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 संत तुकाराम नगर येथून सुलक्षणा शिलवंत-धर या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ‘‘तुतारी’’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, सामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पॅनेलसाठी खासदार निलेश लंके यांचा ‘‘रोड शो’’
घराघरांतून मिळणारा प्रतिसाद, नागरिकांच्या डोळ्यांतील विश्वास आणि संवादातून उमटणारी आपुलकी हीच आपली खरी ताकद असल्याचे त्या सांगतात. “जनतेच्या डोळ्यांतील विश्वासच आम्हाला दररोज कार्य करण्याची नवी ऊर्जा देतो. सत्ता किंवा पद नव्हे, तर लोकांसोबत चाललेला हा प्रवासच मला प्रेरणा देतो,” असे सुलक्षणा शिलवंत-धर यांनी स्पष्ट केले.
प्रस्थापित राजकारणाच्या चौकटीबाहेर जाऊन विकास, विश्वास आणि सामूहिक प्रगतीचा संदेश देत त्या नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. “चला, एकत्र मिळून प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकूया,” हा त्यांचा संदेश मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण करत असून, निवडणूक लढतीला भावनिक आणि सामाजिक परिमाण देत आहे.
“जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं नेतृत्व कधीही डगमगत नाही. प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचताना मला माणसांची स्वप्नं, त्यांची आशा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य दिसतं. हेच माझं बळ आहे. उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मी तुमच्यासोबत, तुमच्यासाठी आणि तुमच्या विश्वासासोबत कायम उभी राहीन.”
– सुलक्षणा शिलवंत-धर, उमेदवार, प्रभाग-20, राष्ट्रवादीश.प.





