Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

म्हाडा पुणे मंडळाची रखडलेली सोडत लवकरच मार्गी? निवडणूक आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद, दोन-तीन दिवसात अंतिम निर्णय…

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाची ४१८६ घरांची सोडत आधी तांत्रिक कारणांमुळे आणि आता आचारसंहितेमुळे रखडली आहे. सोडत रखडल्याने अर्जदार प्रचंड नाराज असून पुणे मंडळावर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन सोडतीस परवानगी देण्याची मागणी केली. या मागणीला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सोडतीचा मार्ग मोकळा करण्यासंबंधी मुख्य सचिवांशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसांत सोडतीच्या परवानगीबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले.

पुणे मंडळाने २० टक्के सर्वसमावेश योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ४१८६ घरांसाठी सप्टेंबरपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे, प्रतिसाद वाढविण्यासाठी सोडतपूर्व प्रक्रियेस दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सोडत दोन वेळा लांबणीवर पडली. तर सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोडत पार पडेल असे वाटत असतानाच तांत्रिक अडचणींमुळे अर्थात अर्जांची छाननी करण्यास विलंब झाल्याने तिसऱ्यांदा सोडत पुढे गेली आणि त्यानंतर सोडत रखडली ती रखडलीच.

हेही वाचा –  राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात २०२६ पर्यंत दिवसा १२ तास सोलरची मोफत वीज… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

पुढे पालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आणि सोडत आचारसंहितेत अडकली. तीन वेळा सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने आणि आता सोडत रखडल्याने अर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेकांनी कर्ज घेऊन, क्रेडिट कार्डने अनामत रक्कम भरली. सप्टेंबरपासून अनामत रक्कम म्हाडाकडे अडकल्याने अर्जदार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सोडत लवकरात लवकर काढण्याची मागणी होत आहे.

सोडत काढणे शक्य नसेल तर अनामत रक्कमेवर व्याजाची मागणीही समाजमाध्यमाद्वारे केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अखेर पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी आचरसंहितेच्या काळात सोडत काढण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. ही म्हाडाची नियमित प्रक्रिया असून सोडतीची सर्व प्रक्रिया आचारसंहितेआधी पूर्ण झाली आहे. आता केवळ निकाल जाहीर करायचा आहे. त्यामुळे त्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोडतीचा निकाल जाहीर करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र यासाठी मुख्य सचिव, तसेच गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांशी निवडणूक आयोग चर्चा करणार आहे. त्यानंतर सोडतीचा अंतिम निर्णय जाहीर करू, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. निवडणूक आयोगाने सोडतीचा निकाल जाहीर करता येईल असे संकेत दिले आहेत. तेव्हा दोन – तीन दिवसांत निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णय येईल आणि सोडत आठवड्याभरात काढली जाईल, असा विश्वास आपल्याला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता अर्जदारांचे आणि पुणे मंडळाचे लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group