‘पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे’ मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार उपाधी नाहीत असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे, ते एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नाहीत. न्यायालयाने एका याचिकेच्या केस शीर्षकात “पद्मश्री” शब्दाच्या वापराबद्दल हे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी सुरू होती. 2004 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर हे देखील एक पक्ष होते. त्यांचे नाव केस शीर्षकात “पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर” असे सूचीबद्ध केले होते. न्यायाधीशांनी यावर आक्षेप घेत म्हटले की हे कायद्यानुसार बेकायदेशीर आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ
उच्च न्यायालयाने 1995 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा हवाला दिला. त्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की पद्म पुरस्कार आणि भारतरत्न ही उपाधी नाही आणि नावापूर्वी किंवा नंतर वापरली जाऊ नयेत. न्यायमूर्ती सुंदरेसन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या कलम १४१ अंतर्गत सर्वांना लागू आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. पुढील कायदेशीर कार्यवाहीमध्ये सर्व पक्ष आणि न्यायालये या नियमाचे पालन करतील असे निर्देश त्यांनी दिले.
पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. हे पुरस्कार कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिले जातात. यंदा क्रिकेटपटू आर. अश्विनसह 71 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले. 2025 मध्ये एकूण 139 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. 7 पद्मविभुषण, 19 पद्मभुषण आणि 113 पद्मश्रींचा समावेश होता.
हेही वाचा – इच्छूक उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
पद्म पुरस्कारांचे नियम आहेत तरी काय?
-देशात नागरी पुरस्कारांची सुरुवात 1954 मध्ये झाली. हे चार पुरस्कार म्हणजे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री.
-हे पुरस्कार 26 जानेवारी रोजी जाहीर केले जातात. मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात हा समारंभ आयोजित केला जातो. या पुरस्कारात पदक आणि प्रशस्तिपत्र असते.
-भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो राष्ट्रीय सेवा, क्रीडा, विज्ञान, साहित्य आणि कला यासाठी दिला जातो. दरवर्षी फक्त तीन लोकांनाच तो दिला जाऊ शकतो.
-एकूण 48 जणांना भारतरत्न मिळाला आहे; तो पहिल्यांदा 1954 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला.
-भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा भारतरत्न मिळालेला एकमेव खेळाडू आहे, तो हा पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण व्यक्ती आहे.
-पद्मविभूषण हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना दिला जातो; त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवांचाही समावेश आहे.
-पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो राष्ट्रासाठी मौल्यवान योगदानासाठी दिला जातो.
-कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यकशास्त्र, समाजसेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतीयांना पद्मश्री प्रदान केला जातो. एका वर्षात 120 पेक्षा जास्त पुरस्कार देता येत नाहीत.




