आजघडीला पंतप्रधान म्हणून शोभणारे केवळ देवेंद्र फडणवीसच; रामराजे नाईक निंबाळकर

फलटण | “मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत, असं स्वप्न पाहिलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक आहे. मात्र आजच्या घडीला पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातून जो नेता शोभून दिसतो, तो म्हणजे केवळ देवेंद्र फडणवीस,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. फलटण येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अनेक दशकांपासून त्यांनी शरद पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. त्यामुळे शरद पवारांचे विश्वासू सहकारी असलेल्या रामराजेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे स्तुतीसुमने उधळली जाणे, ही राजकीय वर्तुळात विशेष चर्चेची बाब ठरली आहे.
हेही वाचा : माधुरी हत्तीणीला नांदणीत परत आणण्याचा मार्ग मोकळा
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणातून केंद्रात जाणार आणि भविष्यात देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी चर्चा अधूनमधून राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या या वक्तव्यामुळे या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी असतील या टिप्पणीवर अलीकडेच स्वतः फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की म्हणाले, बाप जीवंत असताना उत्तराधिकारी शोधणारी आपली संस्कृती नाही. ती मुघलांची संस्कृती आहे. मुघल असं वागायचे. आपण तसं काही करत नाही. तसेच आत्ता पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचं काहीच कारण नाही. ते आत्ता देशाचं अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व करत आहेत. त्यांच्यामुळे जागतिक पातळीवर भारताची मोठी प्रतिमा तयार झाली आहे. पूर्वी भारत म्हणजे ‘किस झाड की पत्ती?’ अशी आपली स्थिती होती. मात्र, आत जग आपल्याकडे आशेने पाहतंय.




