लेकीच्या लग्नात शिवेंद्रराजेंचा मन जिंकणारा निर्णय; ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी CM फंडात दिला निधी

सातारा : सातारा येथे पार पडलेल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतलेला निर्णय पाहून सर्वांची मने जिंकली आहेत. अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन त्यांनी लाडक्या लेकीच्या लग्नात घडवून आणले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्या राजकुमारी ऋणालीराजे भोसले आणि रविराज देशमुख यांचा विवाहसोहळा साताऱ्यातील शेंद्रे परिसरात पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध विभागांचे माजी आणि विद्यमान मंत्री, आमदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी नववधू आणि वराच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा निधी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्त नागरिकांच्या सहाय्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे.
वैयक्तिक आनंदाच्या क्षणीसुद्धा समाजातील अडचणीतील लोकांची जाणीव ठेवत केलेली मदत पाहून सर्व स्तरावर शिवेंद्रसिंहराजेंचे कौतुक करण्यात येत आहे. ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी हा निधी मोठा आधार ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




