भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीत एलपीजी सिलेंडरचा स्फोट
सहा कामगार जखम; अग्निशमन विभागाने परिस्थिती आणली नियंत्रणात

पिंपरी चिंचवड: शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरातील अंबिका पावडर कोटिंग कंपनी मध्ये एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान, या घटनेत १ कामगार गंभीर तथा ५ कामगार किरकोळ जखमी झाले असून प्रथमोपचारानंतर पुढील वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट होऊन आग लागली, व स्फोटाच्या मोठ्या आवाजाने तथा आगीच्या उंच ज्वाला तसेच धूर पसरू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला दिली.
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, नेहरूनगर उप अग्निशमन केंद्र आणि भोसरी उप अग्निशमन केंद्र येथील पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जलदगतीने बचावकार्य सुरू केले. धूर आणि उष्णतेमुळे उद्भवणारा पुढील धोका लक्षात घेऊन, पथकाने सर्व जागांची पाहणी करून कंपनीतील कामगारांना सुरक्षित बाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत सुनील कुमार( गंभीर जखमी), दाऊ कुमार, सुड्ड जयस्वाल, सुरज जाटो, राहुल कुमार, रोहित कुमार हे कामगार जखमी झाले आहेत.
हेही वाचा – अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नेमकं कारण काय?
या कार्यवाहीमध्ये उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, दिलीप गायकवाड यांच्यासह ३० अग्निशामक जवान सहभागी होते. अग्निशामक पथकांनी एकत्रित समन्वयाने बचाव व अग्निशमन कार्य सुरळीतपणे पाडले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून अग्निशमन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
औद्योगिक क्षेत्रातील कामकाजात सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन न करणे ही अनेक दुर्घटनांची प्रमुख कारणे आहेत. नियमित तपासणी, उपकरणांची देखरेख आणि कामगारांना दिले जाणारे सुरक्षा प्रशिक्षण हे घटक दुर्लक्षित झाले तर असे प्रकार पुन्हा घडू शकतात. त्यामुळे औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देणे महत्वाचे आहे.
-विजयकुमार खरोटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड, महापालिका
एलपीजी सारख्या उच्च धोक्याच्या साधनांशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेत नियमित तपासणी, देखभाल आणि कामगारांना आवश्यक प्रशिक्षण देणे ही कंपन्यांची मूलभूत जबाबदारी आहे. या घटनेतून भविष्यातील धोक्यांबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज स्पष्टपणे जाणवते.
– व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर आमचे पथक अत्यंत जलद प्रतिसाद देत काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आढळलेल्या एल पी गॅस सिलेंडर मधून एलपी या ज्वलनशील गॅसची गळती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे “व्हेपर क्लाऊड एक्सप्लोजन” घडले असल्याचा प्राथमिक अंदाज असून सदर परिसरात अधिक प्रमाणात एलपी गॅस सिलेंडर असल्याने कारखान्यातील धूर आणि उष्णतेमुळे बचावकार्य आव्हानात्मक होते, परंतु प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढणे आणि पुढील स्फोटाचे धोके टाळणे हेच आमच्या जवानांचे मुख्य ध्येय होते.
– ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका





