टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी उडवला धुव्वा…

IND W vs SA W Final : भारतीय महिला संघाने अखेर अनेक दशकांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारत आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. भारतीय महिला संघाने २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत केले आणि इतिहास रचला.
भारतीय महिला संघाची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. भारतीय महिला संघाचं याआधी २००५ आणि २०१७ साली विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंगलं होतं. मात्र भारताने तिसऱ्या प्रयत्नात स्वत:ला सिद्ध केलं आणि अखेर २०२५ मध्ये वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली. महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या ५२ वर्षांच्या इतिहासात भारताचे हे पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद आहे. पहिला महिला एकदिवसीय विश्वचषक १९७३ मध्ये खेळवण्यात आला होता.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं दक्षिण आफ्रिकेला २४६ धावांवर गारद केलं. दीप्ती शर्माने चार विकेट घेत सामना फिरवला आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार एल वोल्वार्डचा १०१ धावांची खेळी व्यर्थ ठरली. दीप्ती व्यतिरिक्त, शफाली वर्मानेही चांगली कामगिरी केली. तिने फलंदाजीत ८७ धावा केल्या आणि दोन विकेट घेतल्या. तिला या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
हेही वाचा – निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदानापूर्वी द्यावे लागणार हमीपत्र, एकाच ठिकाणी मतदान करता येणार
तत्पूर्वी, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात गडी गमावत २९८ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे आणि विश्वचषक स्पर्धेतील भारताची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
भारताकडून दीप्ती शर्माने ५८ आणि शेफालीने सर्वाधिक ८७ धावा केल्या. स्मृती मानधनानेही ४५ धावा केल्या. रिचा घोषने २४ चेंडूत ३४ धावांची धमाकेदार खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जने २४ धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने २० धावा केल्या तर अमनजोत कौरने १२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन, तर म्लाबा, डी क्लार्क आणि क्लो ट्रायॉनने प्रत्येकी एक विकेट घेतली.




