संतापजनक! शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
निगडीतील खाजगी क्लासेस मधील घटनेमुळे खळबळ

उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांच्या क्लासमधील घटना
पिंपरी चिंचवड : दोन अल्पवयीन मुलींना जादा क्लासेसच्या नावाखाली बोलावून त्यातील एका अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला.ही घटना शनिवारी (दि. १) दुपारी निगडीतील उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांच्या क्लासमध्ये घडली आहे.
चेतन सुरेशराव चव्हाण (वय ४०, रा. इंम्पिरीयल हाइटस्, भारतमाता हौसिंग सोसायटी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय मुलीने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन चव्हाण याने पिडित मुलगी आणि तिच्या मैत्रीणीला जादा क्लासेससाठी शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास बोलविले. त्यानंतर मैत्रीणीला रसायनशास्त्राचा पेपर सोडविण्यासाठी देऊन चौथ्या मजल्यावर पाठविले. त्यानंतर थोड्या वेळाने ती मैत्रीण काय करते हे पाहण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला लिफ्ट मध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बसली असता ऑफिस बंद करण्यासाठी खाली चल म्हणून तिच्या मागे लागला. तिने विरोध केला असता डोळे मोठे करून तिला दम देत पुन्हा लिफ्ट मधून खाली येत असताना पुन्हा तिचा विनयभंग केला.
हेही वाचा – अबब! लाचखोर फौजदाराच्या घरात घबाड सापडले!
तुला सोडविण्यासाठी घरी येतो असेही आरोपी चेतन चव्हाण म्हणत होता. मात्र मला मावशीकडे जायचे आहे, असे सांगून तिने सुटका करून घेतली. त्यानंतर घरी गेल्यावर तिने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी निगडी पोलीस ठाणे गाठत याबाबत गुन्हा दाखल केला.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निगडी शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तर गेल्या महिन्यात महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील शाळेतही १० वर्षीय मुलीचा विनयभंग शिक्षकाने केला होता.





